मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झांगियानीने आपल्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पोलिसात केली आहे. प्रितीचा सात वर्षांचा मुलगा जयवीरला एका शेजाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. प्रिती झांगियानीने अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान यांची मुख्य भूमिका असलेल्या 'मोहब्बते' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

प्रितीने पती परवीन डब्बाससोबत मुंबईतील खार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरिफ सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचा आरोप प्रितीने केला आहे.

'माझा मुलगा जयवीर खारमधील शिवस्थान इमारतीच्या मैदानात मित्रांसोबत खेळायला गेला होता. दुसऱ्या बिल्डिंगमधील मुलंही तिथे फुटबॉल खेळत होती. त्यावेळी मुलांमध्ये कुठल्यातरी गोष्टीवरुन भांडण झालं. तेवढ्यात जयवीरच्याच वयाच्या एका मुलाने जयवीरच्या तोंडावर बुक्का मारला. त्यामुळे माझा मुलगा त्याला मूर्ख (स्टुपिड) म्हणाला.' असं प्रितीने 'एबीपी न्यूज'शी बोलताना सांगितलं.

प्रिती त्यावेळी मैदानात नव्हती, मात्र इतर मुलांच्या पालकांनी मुलांमध्ये मध्यस्थी करत भांडण सोडवलं. इतर पालकांनीच ही गोष्ट प्रितीच्या कानावर घातली.



'जयवीरवर हात उगारणाऱ्या मुलाने ही गोष्ट आपल्या घरी जाऊन सांगितली. त्यामुळे त्याचे आजोबा मैदानावर आले आणि जयवीरला वाईट-साईट बोलले. त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. तिथे असलेल्या महिलांशीही उद्धटपणे वागले. एका महिलेने त्यांना थांबवलं, तेव्हा मी बायकांशी बोलत नाही, अशी अरेरावीची भाषा त्यांनी वापरली.' असा दावा प्रिती झांगियानीने केला आहे.

'जयवीर रडत-रडत घरी आला. मुलांच्या भांडणांमध्ये आम्ही पडत नाही, पण संबंधित व्यक्तीने लहान मुलं आणि महिलांशी केलेलं गैरवर्तन पाहून आम्ही त्याची पोलिसात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला.' असंही प्रितीने सांगितलं. आरिफ सिद्दीकीने बिनशर्त आणि लेखी माफी मागितली, तर आम्ही पोलिसातील तक्रार मागे घेऊ, असं आश्वासनही प्रितीने दिलं.

प्रिती झांगियानीने ना तुम जानो ना हम, आवारा पागल दिवाना, अनर्थ यासारख्या काही हिंदी चित्रपटांसोबत तमिळ-तेलुगू सिनेमात अभिनय केला आहे. प्रितीने 23 मार्च 2008 रोजी अभिनेता परवीन डब्बाससोबत विवाह केला. त्यांना सात वर्षांचा जयवीर आणि दोन वर्षांचा देव अशी दोन मुलं आहेत.