मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित 'सूर्यवंशम' चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी म्हणजे 21 मे 1999 रोजी सूर्यवंशम सिनेमा प्रदर्शित झाला होता.


वडिल भानुप्रताप यांच्या इच्छेविरोधात हिरा ठाकूर हा तरुण लग्न करतो. वडिलांच्या दृष्टीने नालायक असलेला हिरा नंतर वडिलांचं मन कसं जिंकतो, ही या सिनेमाची कथा. वडील आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत अमिताभ बच्चन दिसले होते.

ई. व्ही. व्ही. सत्यनारायण दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जयसुधा, दिवंगत अभिनेत्री सौंदर्या, रचना बॅनर्जी, अनुपम खेर, कादर खान, बिंदू यासारखे कलाकार होते. अमिताभ यांचा सूर्यवंशम हा 1997 मध्ये रिलीज झालेल्या सूर्यवंशम याच नावाच्या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.

सेट मॅक्स या वाहिनीवर सूर्यवंशम अनेक वेळा दाखवला जातो. यावरुन सोशल मीडियावर बरेच जोक्स व्हायरल झाले आहेत. त्यामुळे 20 व्या वर्षपूर्तीनिमित्त ट्विटराईट्सच्या सर्जनशीलतेला उधाण आलं आहे.

Gopal Shetty | गोपाळ शेट्टी समर्थकांचा कॉन्फिडन्स, मोदींचा मुखवटा लावून लाडू वळले



म्हणून सेट मॅक्सवर सूर्यवंशम वारंवार लागतो...

1999 साली जेव्हा सूर्यवंशम प्रदर्शित झाला, त्याच्या काही वेळ अगोदरच सेट मॅक्स चॅनल लॉन्च झालं होत. काही अनाकलनीय कारणांमुळे त्यांनी सूर्यवंशमचे टेलिकास्ट राईट्स शंभर वर्षांसाठी घेतले होते. आता जेव्हा दुभती गाय विकत घेता, तेव्हा तिच्यापासून जास्तीत जास्त दूध मिळवण्याचा प्रयत्न करणारच. 'सूर्यवंशम ' ही दुभती गाय आहे. त्यामुळेच सूर्यवंशम सातत्याने सेट मॅक्सवर पाहायला मिळतो.

सौंदर्याचा करुण अंत

अमिताभसोबत या चित्रपटात कन्नड अभिनेत्री सौंदर्या मुख्य भूमिकेत झळकली होती. मात्र दु्र्दैवाने हा तिचा पहिला आणि अखेरचा हिंदी चित्रपट ठरला. 2004 साली वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी सौंदर्याचा अपघाती मृत्यू झाला.

सौंदर्याने 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप आणि तेलुगू देसम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सौंदर्या बंगळुरुला जात होती. 17 एप्रिल 2004 रोजी तिने भावासोबत हेलिकॉप्टरने उड्डाण केलं. काही वेळातच शंभर फूटांवरुन हेलिकॉप्टर कोसळलं आणि पेटलं.
सौंदर्याचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी ती पाच महिन्यांची गरोदर होती.

ब्लॉग - या 'सूर्यवंशम'चं काय करायचं ?