मुंबई : एक्झिट पोलवरुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबाबत मीम शेअर करुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता विवेक ओबेरॉयने आज (21 मे) माफी मागितली आहे. तसंच ट्विटरवर शेअर केलेलं मीमही त्याने डिलीट केलं आहे.

विवेकने माफी मागताना दोन ट्वीट केले. पहिल्या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं आहे की, "कधी कधी काही जणांना पहिल्या नजरेत मजेशीर आणि निरुपद्रवी वाटतं, पण इतरांना ते वाटेलच असं नाही. मी मागील दहा वर्ष, 2000 पेक्षा जास्त वंचित मुलींच्या सशक्तीकरणासाठी खर्ची केली आहेत. कोणत्याही महिलेचा अपमान होईल, याचा मी विचारही करु शकत नाही."

दुसऱ्या ट्वीटमध्ये विवेक म्हणतो की, "जर मीममुळे एका महिलेच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. मी माफी मागतो. ट्वीट डिलीट केलं आहे."


वादग्रस्त ट्वीटमध्ये काय होतं?
विवेक ओबेरॉयने सोमवारी (20 मे) तीन फोटोंचं एक मीम आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केलं होतं. मीमचे ओपिनियन पोल, एक्झिट पोल आणि निकाल असे तीन भाग होते. ओपिनियन पोलमध्ये ऐश्वर्या  सलमान खानसोबत दिसत होती. एक्झिट पोलमध्ये विवेक ओबेरॉयसोबत आणि निकालामध्ये ती अभिषेक बच्चन आणि आराध्यासोबत दिसत आहे. ऐश्वर्या आणि तिची मुलगी असलेलं मीम शेअर केल्याने विवेक ओबेरॉयवर सर्व स्तरावरुन जोरदार टीका झाली. तसंच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली.

विवेक ओबेरॉयचं आधीचं स्पष्टीकरण काय?
याआधी वाद वाढल्यानंतर विवेक ओबेरॉय म्हणाला होता की, "जर मी काही चुकीचं केलं असेल तर माफी मागेन, पण मला वाटत नाही की मी चुकी केली आहे. यात चूक काय आहे? कोणीतरी एक मीम ट्वीट केलं आणि मी त्यावर हसलो. पण लोक या गोष्टीला एवढं महत्त्व का देत आहे, हेच समजत नाही. कोणीतरी मला हे मीम पाठवलं होतं. मी हसलो आणि त्याच्या व्यक्तीच्या कल्पकतेचं कौतुक केलं.

संबंधित बातम्या

चोराच्या उलट्या बोंबा, विवेक ओबेरॉयकडून 'त्या' ट्वीटचं समर्थन

एक्झिट पोलबाबत विवेक ओबेरॉयच्या ट्वीटमधून ऐश्वर्याची खिल्ली, विवेकवर टीकेचा भडीमार