Bhupen Hazarika :  प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांची आज 96 वी जयंती आहे. भूपेन हजारिका  (Bhupen Hazarika) यांचा जन्म 08 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादिया येथे झाला. त्यांच्या आसामी गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. भूपेन यांनी त्यांच्या संगीतामधून आसामची संस्कृती आणि कला लोकांपर्यंत पोहचवली. आसामी व्यतिरिक्त भूपेन हजारिका यांनी हिंदी, बंगाली यांसारख्या अनेक भाषांमध्ये गाणी गायली. जाणून घेऊयात भूपेन हजारिका यांच्याबाबत...


भूपेन हजारिका यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. त्यानंतर त्यांचा संगीतक्षेत्रातील प्रवास सुरु झाला. वयाच्या 12 व्या वर्षी ते इंद्रमालती: काक्सोते कोलोसी लोई आणि बिस्वो बिजॉय नौजवान या दोन चित्रपटांसाठी गाणी लिहित आणि रेकॉर्ड करत होते. भूपेन हजारिका यांनी 1946 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पीएचडी मिळवली. त्यानंतर अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले. त्यांनी संगीताच्या माध्यमातून आसामी संस्कृती राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय केली.


हिंदी गाण्यांना प्रेक्षकांची पसंती 
'बुकू हम हम करे...'  या  भूपेन हजारिका यांच्या आसामी गाण्याचा हिंदी अनुवाद गुलजार यांनी केला. त्यानंतर हे गाणं‘रूदाली’या हिंदी चित्रपटात वापरण्यात आलं. 'बुकू हम हम करे...' चं हिंदी व्हर्जन असलेलं ‘दिल हूम हूम करे’हे गाणे भूपेन हजारिका यांनीच गायले. या गाण्याचे मेल आणि फिमेल असे दोन्ही व्हर्जन्स आहेत. यातील फिमेल व्हर्जन हे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायले आहे. गंगा तुम बहती हो क्यों , एक कली दो पत्तियां या त्यांच्या हिंदी गाण्यांना देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  


1977 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. 2012 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण आणि 2019 मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. भूपेन हजारिका यांनी 05 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Bhupen Hazarika, Google Doodle : संगीतकार भूपेन हजारिका यांची 96 वी जयंती; गुगलकडून खास डूडल!