Bhau Kadam On Solapur : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) प्रारंभ तंजावरमध्ये पार पडला आहे. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते सोलापूरमध्ये विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान विनोदवीर भाऊ कदमने सोलापूरमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोलापूरने मायेची उब दिली असल्याचं अभिनेता म्हणाला.


सोलापूरला आलो की चादर घेऊन जायचो : भाऊ कदम


सोलापूर येथील विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान अभिनेता भाऊ कदम म्हणाला,"नाटकाच्या निमित्ताने सोलापूरला येणं होत होतं. आज नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनादरम्यान आलो आहे. सोलापूरला आलो की चादर घेऊन जायचो. एक मायेची उब सोलापूरने दिली आहे".


सुभाष देशमुख म्हणाले,"मी बोलायला टाळतो..कारण मी बोलतो त्याचं ध चा म होतो. मला कोणतेही काम द्या. मी काम करायला तयार आहे. पण मी बोलणारा नाही. मी दिखाऊ किंवा तुम्हाला चांगलं वाटेल असं बोलणार नाही. जे चांगलं आणि टिकाऊन असेल तेच बोलेल. नाट्य संमेलन करावे तर सोलापूरकरानी करावे, अशा पद्धतीने हे संमेलन करू. सोलापूरकरानी कोणताही मानपान न घेता काम करावे". 


पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. जानेवारी महिन्यात होणाऱ्या विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले,"सोलापूरकर नाट्य सेवा मनोभावे करतात हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती आहे". 


चंद्रकांत पाटील म्हणाले,"सोलापूरकर नाट्य सेवा मनोभावे करतात हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे पुणे विभागात पिंपरी चिंचवडमध्ये संमेलन होत असताना सोलापूरला देखील विभागीय संमेलन मिळाले आहे. भाऊ कदम सारखे व्यक्तिमत्व हे ताणतणावात असलेल्या आयुष्यातले तणाव दूर करण्याचे काम करतात. सेल्फी with माटी या उपक्रमाचे चीनचे रेकॉर्ड मोडत आपण रेकॉर्ड केला आहे". 


नाट्यसंमेलनचा रेकॉर्ड व्हायला हवा : चंद्रकांत पाटील


चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले,"पुण्यातल्या बुक फेस्टिवलमध्ये 11 कोटींचे पुस्तक विकले गेले. नाट्यसंमेलन ही अशा पद्धतीने करूयात की त्याचा रेकॉर्ड झाला पाहिजे. दर आठवड्यात पालकमंत्री म्हणून सोलापूरला यायचा मी संकल्प केला आहे. नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने दर आठवड्यात सोलापूरला यायचा प्रयत्न असेल. आचारसंहिता लागण्याआधी सर्व निधी संपवला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करूयात. नाट्य संमेलनाला अमिताभ बच्चन यांना सोलापूरच्या नाट्यसंमेलन घेऊन येणाच्या प्रयत्न आम्ही करू. माझे त्यांच्याशी थेट संबंध नाहीत, मी उगाच ते रोज माझ्यासोबत चहा घेतात अशा बाता करणार नाही. आशिष शेलार यांचे संबंध चांगले आहेत, त्याच्याशी बोलून व्यवस्था करू".