मुंबई : 72 व्या स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून सुपरस्टार सलमान खानने आपल्या आगामी 'भारत' चित्रपटाचा मोशन टीझर रिलीज केला. 50 सेकंदांच्या क्लीपमध्ये सलमानच्या आवाजातील संवाद ऐकायला मिळत आहे.

'बाऊजी कहते थे कुछ रिश्ते जमीन से होते है, और कुछ खून से... मेरे पास दोनो थे' हा डायलॉग टीझरमध्ये ऐकू येतो. सलमान खानने ट्विटर, फेसबुकवरुन टीझर व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबईतील चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सलमानने नुकतंच माल्टामध्ये 'भारत'च्या शूटिंगला सुरुवात केली. 'भारत' पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्राने वैयक्तिक कारणांसाठी 'भारत' चित्रपट सोडल्यानंतर सलमानने तिच्या जागी आपली जुनी मैत्रिण, अभिनेत्री कतरिना कैफला कास्ट केलं. सलमान-कतरिनाची जोडी यापूर्वी पार्टनर, मैने प्यार क्यूं किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांमध्ये एकत्र झळकली आहे. सप्टेंबर महिन्यापासून कतरिना शूटिंगला सुरुवात करणार आहे.

सलमान-कतरिनासोबत तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेह, सुनिल ग्रोव्हर, सतीश कौशिक हे कलाकार 'भारत'मध्ये मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफरच्या खांद्यावर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे.

'भारत' चित्रपटात सलमान विविध वयोगटातील पाच टप्पे रंगवणार आहे. पंचविशीपासून 85 व्या वर्षापर्यंत म्हणजेच 60 वर्षांच्या कालावधीतील पाच वेगवेगळ्या लूक्समध्ये सलमानला पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

'ओड टू माय फादर' या दक्षिण कोरियाई चित्रपटावर 'भारत' आधारित असून सलमानने त्याचे अधिकृत हक्क विकत घेतले आहेत. 'ओड टू माय फादर'मध्ये 1950 पासून आजच्या काळापर्यंतच्या घटना एका सामान्य माणसाच्या नजरेतून दाखवल्या आहेत.

अतुल अग्निहोत्रीच्या रील लाईफ प्रॉडक्शन आणि भूषण कुमारच्या टी-सीरिजने भारत सिनेमाची निर्मिती केली आहे.


संबंधित बातम्या

निकसोबत लग्नासाठी प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला?