मुंबई : देश आज आपला 72 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. या निमित्ताने परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांच्या 'नमस्ते इंग्लंड'चं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं. पण हे पोस्टर वेगळ्याच वादात सापडलं आहे. रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये अर्जुनने इंग्लंडचा ध्वज युनियन जॅकच्या डिझाईनचं टी शर्ट घातलं आहे. परंतु पोस्टरच्या बॅकग्राऊंडला भारताचा नकाशा चुकीचा दाखवण्यात आला आहे.

पोस्टर रिलीज झाल्यानंतर लगेचच लोकांचं लक्ष या चुकीकडे गेलं. पोस्टरमध्ये दाखवलेल्या भारताच्या नकाशातील जम्मू-कश्मीरमधील अक्साई चीनचा भाग गायब आहे. याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.


भारतीय कायद्यानुसार, भारताचा चुकीचा नकाशा बनवणं किंवा दाखवणं हे नॅशनल मॅप पॉलिसी (2005) चं उल्लंघन आहे. याशिवाय हा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट 1961 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. अक्साई चीनच्या मुद्द्यावर भारत आणि चीनमध्ये वाद आहे. 1962 च्या युद्धानंतर चीनने या भागावर अवैधरित्या कब्जा केला आहे.

'नमस्ते इंग्लंड' हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नमस्ते लंडन'चा सीक्वेल आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.