मुंबई : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'भाई - व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. मात्र ऐन रिलीजच्या तोंडावरच या चित्रपटासमोर नवी अडचण उभी राहिली आहे. रणवीर सिंगच्या 'सिम्बा' चित्रपटामुळे 'भाई'ला महाराष्ट्रातच स्क्रीन्स मिळत नाहीयेत.


'...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटानंतर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी चित्रपट वाद निर्माण झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमवत असल्यामुळे 'भाई'ला स्क्रीन्स देण्यासाठी सिंगल स्क्रीन मालक तयार होत नाहीत.

भाई चित्रपटाची उद्याची तिकीटं बूक करण्यासाठी अनेक जण ऑनलाईन आणि वर्तमानपत्रांमध्ये थिएटर शोधत होते, मात्र आपल्या जवळच्या चित्रपटगृहात सिनेमा नसल्यामुळे अनेकांची निराशा झाली. मुंबई-पुण्यात 'भाई' या मराठी चित्रपटाला सिंगल स्क्रीन्स मालकांनी एकही शो देण्यास नकार दिला आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही याला दुजोरा दिला. 'सिम्बा चालतो तर चालू दे. पण आमच्या सिनेमाला एक तरी शो मिळायला हवा' असं मत मांजरेकरांनी मांडलं आहे. मल्टिप्लेक्समध्ये मात्र आपल्याला शो मिळत असल्याचंही महेश मांजरेकरांनी सांगितलं.

खरंतर 'वायाकॉम 18' सारखी मोठी निर्मिती संस्था पाठिशी असतानाही 'भाई'वर अशी वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. परंतु, यात थिएटर मालकांची चूक नसून डिस्ट्रीब्यूटर लॉबीचं प्रेशर असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत त्यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशीही संपर्क साधला आहे.

पुलं हे महाराष्ट्राच्या मनाजवळचं व्यक्तिमत्त्व. त्यामुळे त्यांच्यावर आधारित सिनेमा पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यामुळे 'घाणेकर'च्या वेळी धावलेले राजकीय पक्ष आता काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.