मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनाला असलेला मनसेचा विरोध अखेर मावळला आहे. त्यामुळे आता आपल्या ठरलेल्या तारखेलाच हा सिनेमा प्रदर्शित होईल.
मुख्यमंत्र्यांनी आज या वादात मध्यस्थी करत राज ठाकरे आणि निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांना वर्षा बंगल्यावर बोलावलं. या तिघांमध्ये साधारणपणे तासभर बैठक झाली. बैठकीनंतर निर्माते मुकेश भट्ट यांनी हा गुंता सुटल्याची माहिती दिली.
तसेच यापुढे पाक कलाकारांना कोणत्याही सिनेमात घेणार नाही. सिनेमाच्या उत्पन्नाची ठराविक रक्कम शहीदांच्या कुटुबियांना दिली जाईल असं आश्वासनही मुकेश भट्ट यांच्याकडून देण्यात आलं.
BREAKING : मनसेकडून 'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील
LIVE UPDATE : 28 ऑक्टोबरला 'ऐ दिल है मुश्किल' प्रदर्शित होणार - मुकेश भट
LIVE UPDATE : सिनेमा सुरु होण्याआधी एका फलकाद्वारे उरी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहणार - मुकेश भट
LIVE UPDATE : भविष्यात कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला सिनेमात काम देणार नाही - मुकेश भट
LIVE UPDATE : सिनेमा हिट किंवा सुपरहिट झाला, तरी काही रक्कम शहिदांच्या कुटुंबीयांना देऊ - मुकेश भट
LIVE UPDATE : मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक झाल्याची मुकेश भट यांची माहिती
LIVE UPDATE : भविष्यात कुठल्याही पाक कलाकाराला काम न देण्याचा प्रोड्युसर्स असोसिएशनचा निर्णय - मुकेश भट
LIVE UPDATE : भविष्यात कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला काम देणार नाही - मुकेश भट
LIVE UPDATE : मुख्यमंत्र्यांसोबतची राज ठाकरे आणि करण जोहर यांची बैठक संपली
LIVE UPDATE : 'ऐ दिल...' वादाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु, राज ठाकरे, करण जोहर, अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूर उपस्थित
मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी 'वर्षा' बंगल्यावर कोण कोण उपस्थित आहेत?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
अमेय खोपकर (मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष)
शालिनी ठाकरे
दिग्दर्शक करण जोहर
मुकेश भट
सिद्धार्थ रॉय कपूर
विक्रम भट
LIVE UPDATE : मुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरे, करण जोहर यांची चर्चा सुरु, मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूरही उपस्थित
LIVE UPDATE : मुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरे, करण जोहर यांची बैठक सुरु, 'ऐ दिल है मुश्किल' वादावर मुख्यमंत्र्यांकडून मध्यस्थी
LIVE UPDATE : 'ऐ दिल है मुश्किल' वादाबाबत 'वर्षा'वर बैठक सुरु, मुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरे, करण जोहर उपस्थित
LIVE UPDATE : 'ऐ दिल...' वाद : दिग्दर्शक करण जोहरही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचला
मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाविरोधात मनसे आक्रमक झाली असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर गेले आहेत. तिथे दिग्दर्शक करण जोहरलाही बोलवल्याची माहिती मिळते आहे. या वादात मुख्यमंत्री मध्यस्थी करण्याची शक्यता आहे.
'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. सिनेमा प्रदर्शित केल्यास मनसे आक्रमक स्टाईलने आंदोलन करेल, असा याआधीच मनसेने इशारा दिला आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्री मध्यस्थी करणार?
आता राज ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत आणि तिथे करण जोहरही येणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'ऐ दिल है मुश्किल'च्या वादात मध्यस्थी करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गृहमंत्र्यांकडून सुरक्षेचं आश्वासन
‘ऐ दिल है मुश्कील’ची मुश्कील वाढल्यानं प्रोड्युसर्स असोसिएशननं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडं घातलं. दिग्दर्शक मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूर, विजय सिंह, अपूर्व मेहता या निर्माता दिग्दर्शकांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी बाबुल सुप्रियोसुद्धा उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ला पूर्ण सुरक्षा देण्याचं आश्वासन दिल्याचं मुकेश भट यांनी सांगितलं आहे.
मनसेचा इशारा :
मल्टिप्लेक्स चालकांनी पाक कलाकारांचे चित्रपट दाखवल्यास मनसेची कामगार संघटना कामबंद आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला आहे. करण जोहरच्या विनंतीला मनसेनं कचऱ्याची टोपली दाखवली. आधी चले जावची हाक देऊन तोडफोडीचा इशारा दिलेल्या मनसेनं आता असहकार पुकारला आहे. जर मल्टिप्लेक्समध्ये ‘ऐ दिल है मुश्कील’ प्रदर्शित केला तर मनसेची कर्मचारी संघटना कामबंद आंदोलन करेल अशी घोषणा मनसेनं केली आहे.
पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निवलसह इतर सिनेमा थिएटर्समध्ये 70 टक्के कर्मचारी मनसे कामगार संघटनेचे आहेत. मल्टिप्लेक्समधील तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारीही मनसेशी बांधील आहेत. त्यामुळे मनसे कर्मचारी संघटनेनं संप पुकारला तर थिएटर्स चालणं मुश्कील होईल
चित्रपट प्रदर्शित करु द्या
“ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा शूट केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, यापुढे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा करणार नाही”, अशी विनंती करण जोहरने केली होती.
उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकार असलेले “ऐ दिल है मुश्किल” आणि रईस हे सिनेमे प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला आहे. तसंच मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्यासही सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर करण जोहरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
करणची पोलिस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी
‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने विरोध केल्यानंतर दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने पोलिसात धाव घेतली होती. मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे करणने सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर पुरेशी सुरक्षा देण्याचं आश्वासन मुंबई पोलिसांनी दिलं आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या टीमने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्याचप्रमाणे फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश भट्ट, फॉक्स स्टार इंडियाचे सीईओ विजय सिंह, मामि फिल्म फेस्टिव्हलच्या अनुपमा चोप्रा, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूरही यावेळी उपस्थित होते.
मल्टिप्लेक्सच्या काचा महागड्या असतात
‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना दिला आहे. मनसेने पत्र लिहून मल्टिप्लेक्स चालकांना ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली. तसं न केल्यास मनसे स्टाईल विरोधाला सामोरं जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट प्रदर्शित करण्यास मनसेने विरोध दर्शवला आहे. ‘मल्टिप्लेक्सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरु नका’ असा दमही मनसेने भरला आहे.
‘ऐ दिल है मुश्किल’चा वाद काय आहे?
‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडला. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला.
सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशनने करण जोहरचा सिनेमा थिएटरमध्ये न प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.