Adipurush : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या देशभरात चर्चेत आहे. देशभरातून या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान 'आदिपुरुष' सिनेमावर बंदी घाला म्हणून केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांना शिवसेना खासदारांनी पत्र लिहिलं आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी पत्राद्वारे सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.


केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. 'आदिपुरुष' सिनेमाच्या सुरुवातीलाच भाजपच्या सहा मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून आता या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केली आहे. 


शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की,"आदिपुरुष' सिनेमाच्या माध्यमातून आध्यात्मिक संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच सिनेमातील संवाददेखील पूर्णपणे अनुचित आहेत. त्यामुळे या सिनेमावर बंदी घालण्यात यावी".  


'आदिपुरुष'च्या कमाईला ब्रेक!


'आदिपुरुष'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी फक्त 10.80 कोटी कमावले. त्यानंतर सिनेमाची एकूण कमाई आता 247.90 कोटींच्या जवळपास गेली आहे. तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या 'आदिपुरुष' हा बिग बजेट सिनेमांपैकी एक आहे. रिलीजपूर्वीच या सिनेमाने जवळपास 400 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे पदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट भरमसाठ कमाई करेल अशी आशा असलेला हा चित्रपट आता लवकरच बॉक्स ऑफिसवरुन काढता पाय घेईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमात प्रभासने रामाची भूमिका साकारली आहे. कृती सेननने सीतेची तर सनी सिंहने लक्ष्मणची भूमिका साकारली आहे. देवदत्त नागने हनुमानाची आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे.


ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननेदेखील केली 'आदिपुरुष'वर बंदी घालण्याची मागणी


ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननेदेखील 'आदिपुरुष' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित या सिनेमावर बंदी घालण्यात यावी यासाठी मागणी केली होती. 






संबंधित बातम्या


Adipurush Box Office Collection : 'आदिपुरुष'चा खेळ खल्लास; आकडा घसरतोय तरी रिलीजच्या पाच दिवसांत पार केला 200 कोटींचा टप्पा