मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुरानावर कथाचोरीचा आरोप करण्यात आला आहे. 'बाला' चित्रपटाची कथा चोरल्याची तक्रार करत कमल चंद्रा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. प्रकरण कोर्टात असतानाही सिनेमाचं शूटिंग सुरु केल्यामुळे मुंबईजवळच्या काशीमीरा पोलिसांनी आयुषमानला पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.

आयुषमान पोलिस स्टेशनमध्ये हजर न राहिल्यास त्याला आरोपी ठरवून कारवाई केली जाईल, असा स्पष्ट उल्लेख समन्समध्ये करण्यात आला आहे. वारंवार फोन आणि मेसेज करुनही प्रतिसाद न दिल्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आयुषमानला दिले आहेत.

आयुषमान खुराणासह 'बाला' चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजन यांच्याविरोधात बॉम्बे हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. सुनावणी पूर्ण होण्याआधीच  'बाला' चित्रपटाचं शूटिंग सुरु केल्यामुळे कमल चंद्रा यांनी आयुषमान आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात 29 मे रोजी काशीमीरा पोलिसात तक्रार दाखल केली होती.

VIDEO | खासदार डॉ. अमोल कोल्हे 'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या सेटवर



व्हॉट्सअॅपवर आपण दीड पानी मूळ कथा आयुषमानला पाठवली होती. गोष्ट आवडल्याचं सांगत आयुषमानने आपल्याला भेटीची वेळ दिली. मात्र ऐनवेळी भेट नाकारत आयुषमानने पुन्हा कधीच संपर्क साधला नाही, असा दावा कमल चंद्रा यांनी याचिकेत केला होता.

आयुषमानच्या टीमकडून ही कथा पूर्णपणे आपल्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे. 'बाला' चित्रपटाच्या शूटिंगला 6 मेपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये आयुषमान एका केसगळतीने त्रस्त तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.