मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला 'ठाकरे' चित्रपट शुक्रवारी (25 जानेवारी) रोजी आपल्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी 'ठाकरे' चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाले. महाराष्ट्रभर पहाटेपासूनच चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे हा चित्रपट हिट होणार हे चित्र कालच स्पष्ट झाले होते.


'ठाकरे' हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. दोन्ही भाषांमध्ये मिळून 'ठाकरे'ने पहिल्याच दिवशी तब्बल सहा कोटी रुपयांची कमाई केली आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या चाहत्यांनी तसेच शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी संपूर्ण चित्रपटगृहांचं बुकिंग केलं होतं.


आज प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे. तसेच उद्या रविवारची सुट्टी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आज आणि उद्या चित्रपटगृहांमध्ये 'ठाकरे' चित्रपट पाहतील. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या तुलणेत आज आणि उद्या चित्रपट कमाईत मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.


शुक्रवारी सकाळी मुंबईतील वडाळ्याच्या कार्निव्हल चित्रपटगृहात भल्या पहाटे साडेचार वाजता चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ला तुडुंब गर्दी झाली होती.


या शोसाठी संपूर्ण चित्रपटगृह सजवण्यात आलं होतं. पहाटे चार वाजता आधी पूजा करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या हस्ते चित्रपटाचे उद्घाटन झाले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शोला सुरुवात झाली. त्यानंतर राज्यभर चित्रपटाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.