Vivek Agnihotri on Kedar Shinde Baipan Bhaari Deva Movie : केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. आजही या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. अशातच आता 'बाईपण भारी देवा' या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळायलाच हवा", असं म्हणत बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केदार शिंदेंच्या मराठी सिनेमाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट काय? (Vivek Agnihotri Post on Baipan Bhaari Deva)
विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे,"काल मी 'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा पाहिला. गेल्या काही दिवसांत एवढा सुंदर सिनेमा मी खरंच पाहिला नव्हता. हा सिनेमा ऑस्करसाठी पात्र आहे. या सिनेमालाला राष्ट्रीय पुरस्कार मिळायलाच हवा. सगळ्यांचे अतिशय जबरदस्त काम, खूप सुंदर लिखाण आणि केदार शिंदे यांचे दर्जेदार दिग्दर्शन या सिनेमात आहे".
विवेक अग्निहोत्री यांनी पुढे लिहिलं आहे,"केदार शिंदेंनी यातील बारकावे, टायमिंग आणि छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने काम केलंय. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी यांच्या कामाचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी या सिनेमाच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो. हा सिनेमा नक्की बघा आणि नंतर मला थँक्यू म्हणा".
विवेक अग्निहोत्रींनी केलेल्या कौतुकाचा आनंद : केदार शिंदे
विवेक अग्निहोत्री यांनी पोस्ट केदार शिंदेंनी रिपोस्ट केली आहे. तसेच "थँक्यू सर" असं कॅप्शन लिहिलं आहे. यासंदर्भात एबीपी माझासोबत बोलताना केदार शिंदे म्हणाले,"विवेक अग्निहोत्रींनी केलेल्या कौतुकाचा आनंद आहेच. मराठी सिनेसृष्टी उत्तम काम करते. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाला ऑस्कर मिळायला हवं, अशी इच्छा होती. पण प्रत्येकाची एक वेळ असते. या सिनेमाला नाही मिळाला तर पुढच्या सिनेमाला मिळेल".
'बाईपण भारी देवा' हा सिनेमा सरत्या वर्षातला बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी सिनेमा ठरला आहे. 'बाईपण भारी देवा' प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही पुन्हा पुन्हा चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत आहेत. खरंतर प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये 'बाईपण भारी देवा' विषयी कमालीची उत्सुकता पहायला मिळाली होती, बॉक्सऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल अशी चर्चाही रंगली होती. आणि अगदी तसंच सगळं घडत गेलं. हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते मायबाप प्रेक्षकांमुळेच. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या