आयुषमानच्या चित्रपटाची छप्परफाड कमाई, अजय देवगनला टाकले मागे
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2018 01:14 PM (IST)
'बधाई हो' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यानंतर या चित्रपटाचा या वर्षी सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटाच्या टॉप 10 यादीत समावेश झाला आहे.
आयुषमान खुराना हा बॉलिवूड अभिनेता वेगवेगळ्या भूमिका निवडत असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचा 'बधाई हो' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यानंतर या चित्रपटाचा या वर्षी सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांच्या टॉप १० यादीत समावेश झाला आहे. ‘बधाई हो’ने बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनला मागे टाकले आहे. आयुषमानच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अजय देवगनच्या ‘रेड’ चित्रपटाला मागे टाकले आहे. या चित्रपटाच्या यशाबाबत विचारणा केल्यावर आयुषमान म्हणाला की, ‘मी चित्रपटांची पटकथा निवडताना जे बदल केलेत, त्यामुळे मला हे यश मिळाले आहे’. किती आहे कलेक्शन? बधाई हो प्रदर्शित होऊन १७ दिवस झाले आहेत. या १७ दिवसांमध्ये चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. जंगली पिक्चर्सने निर्मिती केलेला आणि १०० कोटी क्लबमध्ये समाविश्ट झालेला हा आतापर्यंतचा दुसरा चित्रपट ठरला आहे. यंदा जंगली पिक्चर्सच्या ‘राजी’ चित्रपटानेदेखील बक्कळ कमाई केली होती. हे आहेत यंदाचे टॉप फाईव्ह चित्रपट यंदा रणबीर कपूरच्या संजूने सर्वाधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर रणवीर-दिपिकाचा पद्मावत दुसऱ्या स्थानावर आहे. सलमान खानचा ‘रेस ३’, टायगर श्रॉफचा ‘बागी २’ आणि श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ हे चित्रपट अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. बधाई हो या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.