गेला सोमवार इंडस्ट्रीसाठी फार महत्त्वाचा होता. मराठीबद्दल म्हणाल, तर अक्षय कुमारने 'चुंबक'चं प्रमोशन केलं. तिकडे राज ठाकरे यांनी मांजरेकरांच्या पुलंवरच्या सिनेमाला क्लॅप दिला. हे सगळं सुरु असताना आणखी एका सिनेमाने या दिवशी चोरटी धाव घेतली. त्या सिनेमाचं नाव आहे 'ये रे ये रे पैसा २'
होय... संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा' यापूर्वी आला होता. यात उमेश कामत, तेजस्विनी पंडित, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर अशी फळी होती. त्याच्याच सिक्वेलची घोषणा परवा झाली. पण त्यातून नवाच प्रश्न उभा राहिला. खरंतर पहिला भाग होता संजय जाधव यांचा. पण दुसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी टाकण्यात आली आहे हेमंत ढोमेंवर. अरेच्चा.. साक्षात 'दुनियादारी' फेम संजय जाधव यांची गच्छंती झाली कशी? की कुणी केली? बाबो..
आतली बातमी ऐकाल तर थक्क व्हाल. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दादा नाही म्हटल्यावर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत या कलाकारांनी दुसऱ्या भागातून आपलं अंग काढलं आहे. बाकी पहिल्या भागात असलेले मृणाल, संजय, सिद्धार्थ बहुधा असतील दुसऱ्या भागात.
आणि आता जाता जाता सांगू चोरट्या धावेबद्दल. तर परवा संध्याकाळी 'भाई' या सिनेमाची घोषणा होणार होती. त्यावेळी त्याच्या प्रदर्शनाची 4 जानेवारी 2019 ही तारीखही जाहीर होणार होती. ही आतली बातमी लागल्यानंतर सिनेमाची घोषणा व्हायच्या काही तास आधी 'ये रे ये रे पैसा २' वाल्यांनी 4 जानेवारीवर आधीच क्लेम लावला.
आता 'भाईं'ची गोची झाली ना. सगळं ठरलेलं असताना कुणीतरी एका झटक्यात तोंडची तारीख काढून घेऊन जावी, असं झालं ना हे. तुम्ही म्हणता मराठी निर्मात्यांमध्ये तारखांबाबत कम्युनिकेशन नसतं. अरे हाट.. भक्कम कम्युनिकेशन असतं. म्हणून तर अशा धावा घेऊन सामना जिंकता येतो.
संजय जाधव यांनी 'ये रे ये रे पैसा 2' का सोडला?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jun 2018 01:19 PM (IST)
आतली बातमी ऐकाल तर थक्क व्हाल. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दादा नाही म्हटल्यावर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत या कलाकारांनी दुसऱ्या भागातून आपलं अंग काढलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -