मुंबई : गर्लफ्रेण्डला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यात अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कारवाई करुन अरमानला बेड्या ठोकल्या.

अरमानने आपल्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार त्याची गर्लफ्रेंड नीरु रंधावाने गेल्या आठवड्यात मुंबईतील सांताक्रुझ पोलिसात केली होती. त्यानंतर अरमान पसार झाला होता. त्याच्यावर कलम 323, 326, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मारहाणीत नीरु रंधावाच्या डोक्याला जबर मार लागला होता. तिच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. अरमान आणि नीरु यांच्यात घटनेच्या आदल्या दिवशी पैशांच्या देवाणघेवाणीवरुन शाब्दिक बाचाबाची झाली होती.

तारक मेहता...मधील बबितालाही मारहाण

अरमान कोहली यापूर्वीही अनेकदा वादात अडकला होता. अरमान कोहलीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील बबिता अर्थात मुनमुन दत्ताला डेट केलं होतं. 2008 साली मुनमुन आणि अरमानची ओळख झाली होती, मात्र अल्पावधीतच त्यांची मैत्री संपुष्टात आली. नात्यातील ताणतणावातून अरमानने मुनमुनलाही मारहाण केली होती.

बिग बॉसच्या घरात शिव्या

'बिग बॉस'च्या घरात असतानाही अरमानचा स्वत:वरील ताबा सुटला होता. त्यावेळी त्याने सहस्पर्धकांना शिवीगाळ केली होती. प्रकरण अखेर बाचाबाचीवर आलं. अभिनेत्री सोफिया हयातच्या तक्रारीनंतर अरमानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर तो बाहेर आला.

काजोलच्या बहिणीशी जवळीक

बिग बॉसच्या घरात असताना अभिनेत्री काजोलची बहीण तनिषासोबत अरमानची जवळीक वाढली होती. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.