Salman Khan : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात बरीच खळबळ माजली. इतकच नव्हे त्यांच्या हत्येनंतर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) चर्चेत आला. कारण बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने घेतली. त्याचप्रमाणे सलमानसोबत जवळचे संबंध असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं बिष्णोई गँगकडून सांगण्यात आलं आहे.
बाबा सिद्दीकी आणि सलमान यांचे फार जवळचे संबंध होते. सलमान खान बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहचला होता. जवळच्या मित्राच्या जाण्याने सलमान पुरता हादरला होता. त्यानंतर सलमान झीशानच्याही दररोज संपर्कात असल्याचं नुकतच झीशान सिद्दीकी यांनी सांगितलं.
झिशान सिद्दीकी यांनी काय म्हटलं?
झिशान सिद्दीकी यांनी नुकतीच बीबीसी हिंदीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं की, माझ्या वडिलांचे ते मित्र आहेत, त्यामुळे ते माझ्यासाठी सेलिब्रेटी नाहीत. ते आमच्यसाठी घरातील सदस्यांसारखेच. ते मला माझ्या भावांसारखेच आहेत. बाबांच्या हत्येनंतर सलमान खानही खूप दु:खी आहे. बाबा आणि सलमान हे सख्खा भावांपेक्षा जवळचे होते. बाबांच्या जाण्यानंतर सलमानही खूप काळजीत आहे. त्याला रात्रीची झोप लागत नाही. तो फोन करुन विचारपूस करतच असतो. त्यामुळे त्याचा कायमच पाठिंबा राहिल.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
गेल्या वर्षभरापासून सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या धमक्या येत आहेत. काळवीट प्रकरणामुळे सलमान खान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमानसह त्याच्या कुटुंबियांनाही याआधी धमक्या देण्यात आल्या, त्याच्या घरावर गोळीबारही करण्याच आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.