मुंबई : 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तोंडावर निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांचे प्रमोशनसाठी देश-विदेशात दौरे सुरु आहेत. अशाच एका परदेश दौऱ्यादरम्यान 'एमिरेट्स एअरलाईन्स'च्या कर्मचाऱ्यांनी आपल्याशी वर्णद्वेषी आणि उद्दाम वर्तन केल्याचा आरोप 'बाहुबली'च्या निर्मात्यांनी केला आहे.


बुधवारी बाहुबली चित्रपटाची टीम दुबईहून हैदराबादला परतत होती. त्यावेळी एमिरेट्स विमान कंपनीचे कर्मचारी आपल्याशी उद्धटपणे वागले आणि त्यांनी वर्णद्वेषी टिपण्णी केली, असा दावा बाहुबलीचे निर्माते शोबू यरलागड्डा यांनी ट्विटरवर केला आहे. दुबईत बोर्डिंग गेटवर विनाकारण आपल्याला त्रास दिल्याचंही शोबू म्हणाले.

https://twitter.com/Shobu_/status/857019805366353920

https://twitter.com/Shobu_/status/857020674489016321

'माझ्या मते एमिरेट्सचा एक कर्मचारी वर्णद्वेषी होता. मी एमिरेट्सच्या विमानाने नियमित प्रवास करतो. मात्र पहिल्यांदाच अशाच प्रकारचा आविर्भाव पाहायला मिळाला.' असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. शोबु यांच्या ट्वीटची दखल घेत 'एमिरेट्स सपोर्ट'ने दिलगिरी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/EmiratesSupport/status/857068163879636999

'डायरेक्ट मेसेजमध्ये तुमचे बुकिंग रेफरन्स कळवा. त्यानुसार आम्ही पुढील तपास करु' असं उत्तर एमिरेट्सने दिलं आहे. बाहुबलीच्या निर्मात्यांसोबतच दिग्दर्शक राजमौली आणि प्रभास, राणा डुग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी हे कलाकार दुबईत चित्रपटाचं प्रमोशन करत होते.

बाहुबलीचा दुसरा भाग शुक्रवार 28 एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्ल्याळम आणि कन्नड या चारही दाक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट 8 हजार स्क्रीन्सवर झळकणार आहे.

संबंधित बातम्या :


जेट एअरवेजच्या पायलटवर हरभजनचा संताप, वर्णद्वेषाचा आरोप