मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमाने भारतात छप्परफाड कमाई केल्यानंतर आता हाच सिनेमा चीनमध्येही प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे दंगल सिनेमाने चीनमध्ये पहिल्या तीन दिवसात तब्बल 72 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. फिल्म मार्केट अनॅलिस्ट तरन आदर्श यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली.
चीनमध्ये आमीरचा दंगल सिनेमा प्रदर्शित होण्याआधी जगभरात 742 कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘दंगल’ची आतापर्यंतची एकूण कमाई 814 कोटी एवढी झाली आहे.
‘बाहुबली 2’ सिनेमाने 9 दिवसांतच जगभरात एक हजार कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. जर ‘दंगल’ने चीनमध्ये आणखी गल्ला जमवला, तर बाहुबली 2 सिनेमालाही टक्कर देईल, असे म्हटले जात आहे.
चीनमध्ये ‘दंगल’ सिनेमा 9 हजार स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा चिनी भाषेत ‘Shuaijiao Baba’ असे नाव आहे. आमीरचाच याआधी ‘पीके’ही चीनमध्ये रिलीज झाला होता. ‘पीके’ सिनेमाने चीनमध्ये सुमारे 100 कोटींची कमाई केली होती.
‘बाहुबली 2’ला टक्कर देईल की नाही, हे आता सांगणं शक्य नाही. मात्र, आमीर स्वत:च्याच ‘पीके’ सिनेमाचा विक्रम नक्कीच मोडेल, यात शंका नाही.