बाहुबली 2 म्हणजे 'बाहुबली : द कन्क्ल्युजन'चा पहिला-वहिला रिव्ह्यू समोर आला आहे. उमैर साधू या यूके, यूएईमधील सेन्सॉर बोर्डाचा सदस्य आणि समीक्षकाने सिनेमाचा रिव्ह्यू दिला आहे. ट्विटरवर उमैरने दिलेल्या माहितीनुसार त्याने बाहुबली 2 ला पाच स्टार्स दिले आहेत.
हॉलिवूडमधील लेजेंडरी चित्रपट लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि हॅरी पॉटरशी उमैरने बाहुबली 2 ची तुलना केली आहे. अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रभासवर त्याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय भल्लालदेव साकारणारा राणा डुग्गुबाती, रम्या कृष्णनने साकारलेली शिवगामी या व्यक्तिरेखाही मनावर छाप पाडून जात असल्याचं त्याने सांगितलं आहे.
https://twitter.com/sandhumerry/status/857223459960569856
बाहुबली 2 मधील उत्तुंग सेट्स, व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर, ध्वनी, संकलन, छायाचित्रण यासारख्या तांत्रिक बाबींवरही उमैरने स्तुतिसुमनं उधळली आहेत. त्याचप्रमाणे कथा, पटकथा, संवाद, संगीतही अत्युच्च दर्जाचं असल्याचं त्याने सांगितलं आहे. या चित्रपटाची भविष्यात क्लासिक्समध्ये गणना होईल, असा विश्वासही उमैरने व्यक्त केला आहे.
यूएईच्या सेन्सॉर बोर्डाने बाहुबली 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर उभं राहून टाळ्या वाजवल्याचा उल्लेखही त्याने एका ट्वीटमध्ये केला आहे.
https://twitter.com/sandhumerry/status/857174066767290369
विनोद खन्ना यांच्या निधनामुळे प्रीमियर शो रद्द
विनोद खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून गुरुवारी होणारा बाहुबली-२ चा प्रिमियर शो रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. बाहुबलीच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला.
"विनोद खन्ना यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी दु:खात आहे, आम्हीही या दु:खात सहभागी असून, आजचा बाहुबलीचा प्रीमियर शो रद्द करत आहोत." असं बाहुबलीच्या निर्मात्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
'बाहुबली : द बिगिनिंग' 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. बाहुबली 2 च्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पहिला भाग पुनर्प्रदर्शित करण्याचा घाट निर्मात्यांनी घातला, मात्र प्रेक्षकांनी याकडे सपशेल पाठ फिरवली आहे. 'बाहुबली : द बिगिनिंग'च्या री-रिलिजला पहिल्या तीन दिवसात अवघ्या दोन कोटींचा गल्ला जमवता आला.
एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.
बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.