मुंबई : ‘रुस्तम’ सिनेमात परिधान केलेल्या वर्दीचा लिलाव करण्याचा निर्णय बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने घेतल्याने वादाला तोंड फुटलं आहे. इतकंच नाही तर त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला धमकीही मिळाली आहे.


‘परंतु चांगल्या कामासाठी वर्दीचा लिलाव करत असून त्याच चुकीचं काहीच नाही,’ असं अक्षयने स्पष्ट केलं. न्यू इंडिया कॉनक्लेव्हचा ब्रॅण्ड अम्बेसेडर असलेल्या अक्षयने मंगळवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात वर्दीच्या वादावर भाष्य केलं.

अक्षय कुमार म्हणाला की, “या मुद्द्यावर माझा पत्नीला पाठिंबा आहे. मी आणि माझी पत्नी चांगल्या हेतूने चांगलं काम करत आहोत. सिनेमात कॉश्चूम वापरला होता. चांगल्या कामासाठी त्याचा लिलाव होत आहे. आम्ही चुकीचं करतोय, असं मला वाटत नाही.”

“जर कोणाला ह्यात चुकीचं वाटत असेल, तर मी त्याबाबत काहीही करु शकत नाही,” असंही तो पुढे म्हणाला.


2016 मध्ये आलेल्या ‘रुस्तम’ सिनेमात अक्षय कुमारने नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. सिनेमातील त्याच वर्दीचा लिलाव करणार असल्याचं अक्षय कुमारने ट्विटरवर जाहीर केलं होतं. त्याची पत्नी ट्विंकलनेही समर्थन केलं होतं.


मात्र सोशल मीडियावर यावर जोरदार टीका झाली होती. नौदल अधिकाऱ्याच्या वर्दीचा लिलाव करणं कसं चुकीचं आहे, हे एकाने फेसबुकवर सांगत ट्विंकल खन्नावर निशाणा साधला. “तू आमच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवलास, आम्ही तुझं नाक कापू,” अशी धमकीही तिला मिळाली होती.

“मला ऑनलाईन मिळत असलेल्या हिंसक धमक्यांना उत्तर देणार नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन. एखादी महिला सिनेमात वापरलेला कॉश्च्यूम जर चॅरिटीसाठी वापरत असेल तर तिला हिंसक धमकी देणं कितपत योग्य आहे?”, असं ट्विंकल खन्ना म्हणाली.