पुणे : विविधांगी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल नृत्य प्रयोगादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. एकबोटे यांचं वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी निधन झाल्यानं मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. नाट्यत्रिविधा कार्यक्रम सुरु असताना शेवटच्या भैरवीसाठी उभ्या असताना अश्विनी एकबोटे स्टेजवरच कोसळल्या. त्यांना तातडीने जवळच्या गोरे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर शोकळला पसरली आहे.

अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या. अश्विनी यांनी अनेक मराठी चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी सिनेमात त्यांची भूमिका होती.