मुंबई : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालला मोठा दिलासा मिळाला आहे. एका बिझनेसमनला केलेल्या मारहाणप्रकरणी वांद्रे सत्र न्यायालयाने विद्युत जामवाल आणि त्याचा मित्र हरीशनाथ गोस्वामी याची निर्दोष सुटका केली आहे. सप्टेंबर 2007 मधील या प्रकरणात  कोर्टाने तब्बल 12 वर्षांनी हा निकाल दिला आहे.

विद्युत जामवालवर जुहूमधील एका बिझनेसमनच्या डोक्यात काचेची बॉटल फोडल्याचा आरोप होता. मात्र या घटनेशी संबंधित इतर कोणताही साक्षीदार पोलिसांकडे नव्हता. त्यामुळे पुराव्यांअभावी कोर्टाने आज त्याची निर्दोष मुक्तता केली.

31 ऑगस्टच्या मध्यरात्री विद्युत जामवाल त्याच्या काही मित्रांसह ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार्टी करत होता. ते सगळे दोनच्या सुमारास हॉटेलमधून जाण्यासाठी निघाले असता, जुहूमधील बिझनेसमन राहुल सुरीने विद्युतच्या एका मित्राला ढकललं. यानंतर वाद वाढला आणि विद्युत तसंच त्याचा मित्र हरीशनाथ गोस्वामी यांनी राहुल सुरीला मारहाण केली, असा आरोप आहे.

विद्युत जामवाल सध्या आगामी चित्रपट कमांडो 3 मध्ये व्यस्त आहे. 6 सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आदित्य दत्त यांनी 'कमांडो 3' मध्ये विद्युत जामवालसह अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन देवैया यांचीही प्रमुख भूमिका आहे.

तर यंदा मार्च महिन्यात विद्युत जामवालचा 'जंगली' चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटातही विद्युतची अॅक्शन पाहायला मिळाली होती. सिनेमाने फारशी कमाई केली नसली तरी विद्युतचा अभिनय अनेकांना आवडला.