Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) सध्या चर्चेत आहेत. अशोक सराफ यांच्या चहात्यांनी त्यांना एक आगळीवेगळी भेट दिली आहे. अशोक सराफ यांचे फोटो असलेल्या टपाल तिकिटाचा अनावरण सोहळा भांडुप येथे पार पडला. भारत सरकारच्या टपाल विभागातून माय स्टॅम्प योजनेअंतर्गत अभिनेते अशोक सराफ यांचा फोटो असलेलं तिकीट त्यांना देण्यात आलं आहे. 


अशोक सराफ यांचे नाव नुकतेच पद्मश्री पुरस्कारासाठी सरकारकडून सुचविण्यात आले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी अशोक सराफ यांचा फोटो असलेलं टपाल तिकीट असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण करून त्यांना या निमित्ताने एक आगळीवेगळी भेट दिली आहे. 


टपाल तिकिटाचे अनावरण सोहळ्यादरम्यान अशोक सराफ म्हणाले की,"हा मी माझा मोठा सत्कार समजतो. माझं चित्र असलेला स्टॅम्प प्रदर्शित करावा ही मोठी बाब आहे. त्यामुळे मला या गोष्टीचं कौतुक आहे. आता इमेलचा जमाना आहे. त्यामुळे स्टॅम्प कोण विकत घेणार हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. 


पद्मश्री पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस


अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ (Ashok Saraf) यांना देण्यात येईल, राज्य सरकार तशी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. 


सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते,"अशोक'चा अर्थ म्हणजे दुःखाला दुर ठेवणे आहे. सहजपणे अभिनय करणे हा त्यांचा गुण. मराठीसह हिंदी रसिकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. कर्तृत्व आणि नम्रपणा म्हणजे अशोक सराफ. त्यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटले जाते. समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचे कठीण कार्य त्यांनी अनेक वर्ष केले. त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले. अभिनयासोबत त्यांची शब्दफेकही ताकदीची आहे."


अशोक सराफ यांनी आजवर अनेक नाटक, सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. 'अशोक मामा' म्हणून ते इंडस्ट्रीत ओळखले जातात. अनेक सुपरहिट सिनेमांचा ते भाग आहेत. अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. सत्तरच्या दशकात अशोक सराफांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली.


'ययाती' या नाटकाच्या माध्यमातून अशोक सराफ यांनी त्यांच्या मनोरंजनसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अनेक संगीत नाटकांमध्ये त्यांनी छोटी-मोठी काम केली. दरम्यान 'दोन्ही घरचा' या सिनेमासाठी त्यांना विचारणा झाली. या सिनेमात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांचा 'पांडू हवालदार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमामुळे ते रातोरात स्टार झाले.


संबंधित बातम्या


Ashok Saraf : पद्मश्री पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस