Ashok Saraf : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी या सिनेमाबद्दल व्यक्त होत आहेत. बहुतांश प्रेक्षकांची मतं स्त्रियांना 'स्त्री' म्हणून सॉफ्ट कॉर्नर मिळतो, पुरुषांना मात्र व्यक्त होता येत नाही किंवा अन्याय झाला तरी ते मुकाट्याने सर्व सहन करावं लागतं,  अशा प्रकारची असतात. यासंदर्भात मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी मात्र थोडं वेगळं मत व्यक्त केलं आहे.


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले, "कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांना एक स्त्री म्हणून नेहमी सॉफ्ट कॉर्नर दिला जातो आणि त्यामुळे पुरुषांना कुठे व्यक्त होता येत नाही... ते सगळं सहन करत राहतात हे चुकीचं आहे. कर्तृत्वानुसार प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करता येतं. स्त्री असो वा पुरुष कोणाला संधी मिळाली नाही, असं कधी होत नाही. कर्तृत्वानुसार प्रत्येकाला काम मिळत राहतं". 


'बाईपण भारी देवा'मुळे मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आलेले नाहीत : अशोक सराफ


'बाईपण भारी देवा' या सिनेमाबद्दल बोलताना अशोक सराफ (Ashok Saraf On Baipan Bhaari Deva) म्हणाले,"बाईपण भारी देवा'मुळे मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आलेले नाहीत. याआधी 'वेड' (Ved), 'सैराट' (Sairat) हे सिनेमेही चांगले चालले आहेत. अजून सुगीचे दिवस आलेले नाहीत... यायचे आहेत. एक सिनेमा चालला म्हणजे सुगीचे दिवस आले, असं म्हणता येणार नाही". 


'बाईपण भारी देवा' या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते,"बाईपण भारी देवा' हा सिनेमा मी पुरुषांसाठी बनवला आहे. जोपर्यंत पुरुष स्त्रियांचं मन ओळखू शकत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी आपल्या घरातील पुरुषांना सिनेमा दाखवणं जास्त गरजेचं आहे". थोडक्यात केदार शिंदे यांचं हे वक्तव्य आणि अशोक सराफ यांची प्रतिक्रिया पुरुषांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.


'बाईपण भारी देवा' हा सिनेमा पाहायला ज्याप्रमाणे स्त्रियांच्या झुंडी जात आहेत त्याप्रमाणे खरंतर पुरुषांच्या झुंडीही आता जायला हव्यात. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. 


संबंधित बातम्या


Kedar Shinde ON Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा मी पुरुषांसाठी बनवला आहे : केदार शिंदे