Movie Piracy: एखादा नवीन चित्रपट आला की तो लगेचच तमिळ रॉकर्ससह योमूव्हीज आणि अन्य वेबसाईटवर अपलोड केला जातो. फुकटात आणि घरात चित्रपट पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात जात नाहीत. त्यामुळे निर्माता, वितरकांचे प्रचंड नुकसान होते. पायरसीमुळे चित्रपट उद्योगाला दरवर्षी 20 हजार कोटींचा फटका बसतो. पायरसी रोखण्यासाठी चित्रपट निर्माते केंद्र सरकारच्या मागे लागले होते. केंद्र सरकारने आता पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली असून राज्यसभेत ‘सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा,2023 मंजूर करण्यात आला आहे. सुधारित कायद्यानुसार आता जे चित्रपटाची पायरेटेड कॉपी तयार करतील, त्यांना चित्रपट निर्मितीच्या खर्चापैकी पाच टक्के दंड आणि तीन वर्षांचा कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
पायरसी रोखण्यासाठी आणि सेंसॉर बोर्डाच्या नियमात बदल करण्यासाठी खरे तर 2019 मध्ये 12 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा 2019 हे विधेयक सादर करण्यात आले होते. हे विधेयक नंतर माहिती तंत्रज्ञान विभागाशी संबंधित स्थायी समितीकडे चर्चेसाठी पाठवण्यात आले. स्थायी समितीने यावर 2020 मध्ये अहवाल दिला. त्यानंतर 18 जून 2021 मध्ये हे नव्या विधेयकाबाबत लोकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. त्या सूचना आणि हरकती लक्षात घेऊन हे नवे विधेयक सादर करण्यात आले.
तसेच या विधेयकात आणखी एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे आणि तो आहे सेंसॉर संदर्भात आहे. एखाद्या चित्रपटाला आता सेंसॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्यानंतर केंद्र सरकारलाही त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. तसेच चित्रपट प्रमाणपत्रासाठी यूए 7, यूए 13+ आणि यूए 16+ अशा तीन नव्या श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर आता चित्रपटासाठी दिले जाणारे प्रमाणपत्र फक्त दहा वर्षांसाठी वैध असण्याऐवजी कायमस्वरूपी वैध असणार आहेत. तसेच टीव्हीवर आतापर्यत फक्त ‘सर्वांसाठी’ प्रमाणपत्र असलेले चित्रपटच दाखवले जात, पण आता नव्या कायद्यानुसार ए, यूए किंवा एस (विशेष गट) चित्रपटांमध्ये काही मोजके बदल केल्यानंतर ते चित्रपट टीव्हीवर दाखवता येणार आहेत.
'या' चित्रपटांना बसला होता पायरसीचा फटका
आदिपुरुष,ब्रह्मास्त्र किसी का भाई किसी की जान, तू झूठी मैं मक्कार यांसारखे बिग बजेट चित्रपटांना पायरीचा फटका बसला होता. हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर ऑनलाइन लीक झाले होते. एखादा चित्रपट जर ऑनलाइन लीक झाला तर त्याचा परिणाम त्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतो.
संबंधित बातम्या