नवी दिल्ली : 'आशिकी' चित्रपटामुळे गाजलेला अभिनेता राहुल रॉयने राजकारणात आपली इनिंग सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत राहुल रॉयने भाजपमध्ये प्रवेश केला.


हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असल्याचं सांगत राहुलने भाजपचे आभार व्यक्त केले. 'ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शाह आपल्या देशाला पुढे नेत आहेत, आणि ज्याप्रकारे गेल्या दोन वर्षात जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, ते उल्लेखनीय आहे. भाजपप्रवेशाचा निर्णय घेऊन मी समाधानी आहे' असं राहुल रॉय म्हणाला.

देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची भावना राहुलने बोलून दाखवली. पक्ष जी जबाबदारी सोपवेल, ती पार पाडण्याची तयारीही त्याने बोलून दाखवली.

1990 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी राहुल रॉयने ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी'तून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने जुनून, फिर तेरी कहानी याद आयी यासारख्या सिनेमातही अभिनय केला. राहुलने 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा पहिला सीझनही जिंकला होता.