मुंबई : तीन वर्षांपूर्वी जतन केलेल्या बीजाच्या माध्यमातून (फ्रोझन एग्ज) माजी मिस इंडिया डायना हेडन दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आहे. 44 वर्षीय डायना यावेळी ट्विन्सना जन्म देणार आहे.
जानेवारी 2016 मध्येही तिने फ्रोझन एग्ज पद्धतीनेच पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी, आठ वर्षांपूर्वी जतन केलेल्या बीजातून तिला अपत्यप्राप्ती झाली होती.
गेल्या काही वर्षांत अप्रत्यप्राप्तीच्या पद्धती कशा आधुनिक झाल्या आहेत, हे यातून दिसून येत असल्याचं डायनाच्या डॉक्टर असलेल्या आयव्हीएफ डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सांगितलं.
चाळिसाव्या वर्षी डायना कॉलिन डिकच्या प्रेमात पडली. त्यावेळी आपल्याला एंडोमेट्रिओसिस असल्याचं तिला समजलं. अशावेळी महिलांना गर्भधारणेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीसाठी तिने बीज गोठवण्याचा निर्णय घेतला.
चाळीशीत गर्भधारणेसाठी काही स्त्रिया बीज जतन करुन ठेवण्याची पद्धत वापरतात. दशकभरापूर्वी ही पद्धत आव्हानात्मक होती. पस्तिशीतील हजारो स्त्रिया बीज गोठवून ठेवत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
काही जणींना लग्नच करायचं नसतं, तर कोणाला योग्य जोडीदार सापडलेला नसतो. त्यामुळे अशा महिलांसाठी हा पर्याय लाभदायी असल्याचं डॉक्टर म्हणाले.