Adipurush: आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट काल (16 जून) प्रेक्षकांच्या भेटीस आला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. पण सोशल मीडियावर मात्र अनेक नेटकऱ्यांनी या चित्रपटाला ट्रोल केलं. आदिपुरुष चित्रपटातील कलाकारांच्या लूकला आणि डायलॉग्सला सध्या अनेक नेटकरी ट्रोल करत आहे. या सर्व वादावर आता रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अरुण गोविल?
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुण गोविल म्हणाले ,"प्रेक्षकांनी त्यांचं मतं मांडलं आहे... रामायण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे आणि आता ज्याप्रकारे (चित्रपट) याबद्दल बोलले जात आहे, हे जाणून घेतल्यानंतर मन दुखावले आहे. रामायणाची मूळ भावना आणि रुप बदलण्याची गरज नव्हती. रामायण हा आपल्यासाठी श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे. त्याच्याशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे अस्वीकार्य आहे. चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स आणि सादरीकरणाची बाब वेगळी आहे,पण महत्वाची बाब भूमिकांची मांडणी योग्य पद्धतीने करण्याची आहे. त्याबद्दल बरेच बोलले जात आहे, जे चिंताजनक आहे."
"राम, सीता, हनुमान यांना आधुनिकता आणि पौराणिक या गोष्टींच्या चौकटीत विभागणे चुकीचे आहे. त्या सर्वांचे स्वरुप आधीच ठरलेले आहे, मग तेच रुप चित्रपटात दाखवायला काय हरकत होती?" असंही अरुण यांनी सांगितलं.
अरुण गोविल म्हणाले की, "आदिपुरुष चित्रपटामध्ये रामायणाची कथा दाखवण्यापूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांना लोकांच्या श्रद्धेच्या विषयाशी संबंधित असणारे रामायण कसे सादर करावे? याचा विचार केला पाहिजे होता. रामायणातील पूर्वीच्या प्रस्थापित असलेल्या भूमिकांमध्ये काय चूक होती? नवीन फॉरमॅटमध्ये प्रयोग करण्याची काय गरज होती? मूळ भावनांशी छेडछाड करून चित्रपटाच्या निर्मात्यांना काय सिद्ध करायचे होते?
अरुण म्हणाले की, "जर निर्मात्यांनी हा चित्रपट लहान मुलांसाठी बनवला असेल तर त्या मुलांना विचारा की, हा चित्रपट त्यांना आवडला की नाही?"
चित्रपटाच्या संवादांबद्दल अरुण गोविल म्हणाले की, "मला अशा प्रकारची भाषा आवडत नाही आणि मी नेहमीच संयमी भाषा वापरतो आणि अशा परिस्थितीत मी रामायणात अशा भाषेचे समर्थन करत नाही.
"हॉलिवूडपासून प्रेरित असलेल्या कार्टून फिल्मप्रमाणे रामायण सादर करणे, हे कोणत्याही प्रकारे पचनी पडणारे नाही. चित्रपटाच्या संशोधनाचा विचार करताना निर्मात्यांनी क्रिएटिव्ह लिबर्टी घेतले आहे, परंतु जर ते चित्रपटात त्यांचे नवीन इनपुट घालत असतील तर ते योग्य नाही. आदिपुरुष चित्रपट बनवताना या चित्रपटाचे निर्माते काय विचार करत होते, हे मला कळले नाही." असंही अरुण गोविल यांनी सांगितलं.
चित्रपटामधील कलाकारांबद्दल काय म्हणाले अरुण गोविल?
चित्रपटांमधील कलाकारांबाबत अरुण म्हणाले, "या सर्व गोष्टींमध्ये कलाकारांचा दोष नसतो, त्यांना दिलेली भूमिका, त्यांना देण्यात आलेलं स्वरुप हे चित्रपटाचे मेकर्स ठरवत असतात. "
बॉलिवूडमध्ये यापुढे रामायणावर चित्रपट बनवण्याच्या विचार करणाऱ्या निर्मात्यांना सल्ला देत अरुण म्हणाले , मी एवढेच सांगू इच्छितो की फिल्म मेकर्सनं रामायणाच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड करु नये. अरुण गोविल यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे की, त्यांना हा चित्रपट अद्याप पाहिला नाही, पण याविषयी त्यांनी खूप काही वाचले आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: