पुणे : नुकतंच प्रदर्शित झालेला कॉलेज डायरी हा सिनेमा जितक्या थिएटर्समध्ये प्रदर्शित होणं अपेक्षित होतं तितक्या थिएटर्समध्ये प्रदर्शित न झाल्याने कलाकारांनी वितरकांना चांगलाच चोप दिला आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर हा प्रकार घडला. या चित्रपटाचे कलाकार आविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी वितरक योगेश गोसावी आणि विशाल सांगळे यांना भर रस्त्यावर चोप दिला.


कॉलेज डायरी सिनेमाला थिअटर्स न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता असलेले अनिकेत घाडगे यांचं म्हणणं आहे. दरम्यान याविरोधात दोघांकडूनही अद्याप पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

कॉलेज डायरी हा सिनेमा गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा सिनेमा राज्यातील 100 थिएटर्समध्ये दाखविण्याचे आश्वासन वितरक असलेल्या योगेश गोसावी आणि सचिन पारेकर यांनी निर्मात्यांना दिले होते. तसेच त्याबाबतचे पैसे देखील घेतले होते.

प्रत्यक्षात हा सिनेमा केवळ 45 थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. तसेच चित्रपटाला योग्य वेळा न दिल्याने चित्रपट लोकांपर्यंत पोहोचलं नसल्याचं देखील घाडगे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आज या रागातून सिनेमातील कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी वितरकांना चांगलाच चोप दिला.

कॉलेज डायरीच्या निर्मत्यांनी घर आणि शेत विकून 10 लाख रुपये वितरकाला दिले होते, असं त्यांच म्हणणं आहे. यावेळी नव्याने चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांनी अशा वितरकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी केलं.