'सैराट'च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकानंही घेतली दखल!
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2016 03:54 PM (IST)
मुंबई: प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळें यांचा 'सैराट' सिनेमा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात धुमाकूळ घालतो आहे. 'झिंग झिंगाट' या गाण्यानं तर प्रत्येकाला थिरकायला लावलं आहे. अवघ्या 11 दिवसात तब्बल 41 कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमाची आता जगप्रसिद्ध मासिक 'फोर्ब्स'नेही दखल घेतली आहे. अनेक चित्रपट महोत्सवात आपली छाप पाडणाऱ्या सैराटची आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जात आहे. सैराटने नटसम्राट चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं होतं. 'सैराट' मराठीत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणीच्या प्रेमकथेनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं असल्याचंही फोर्ब्सनं म्हटलं आहे. मराठी सिनेमांची कमाई यापूर्वी ‘दुनियादारी’ या सिनेमाने 26 कोटी कमावून, मराठी सिनेमाच्या कमाईचा ट्रेण्ड तयार केला होता. मग ‘टाईमपास’ या सिनेमाने त्यापुढे मजल मारून 32 कोटींची कमाई केली. याशिवाय ‘टाईमपास 2’नेही 28 कोटी कमावले होते. मात्र ‘लय भारी’ सिनेमाने तब्बल 38 कोटींचा गल्ला जमवून, मराठी सिनेसृष्टीत कमाईचा विक्रम प्रस्थापित केला होता. मराठी सिनेमांची भरारी *दुनियादारी : 26 कोटी *टाईमपास – 32 कोटी *टाईमपास 2 – 28 कोटी *लय भारी – 38 कोटी * नटसम्राट – 40 कोटी *कट्यार काळजात घुसली – 31 कोटी