मुंबई : मुन्नाभाई सीरिजमधील 'सर्किट' या व्यक्तिरेखेमुळे प्रकाशझोतात आलेला बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अर्शदच्या मुंबईतील वर्सोवा परिसरातील बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने जमीनदोस्त केला आहे.


बेकायदेशीरपणे अतिरिक्त मजला बांधल्याप्रकरणी बीएमसीने सोमवारी अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई केली. या कारवाईत त्याने विनापरवाना बांधलेला मजला तोडण्यात आला. विशेष म्हणजे या अनधिकृत बांधकामाबद्दल पालिकेला चार वर्षांपूर्वीच माहिती मिळाली होती.

पालिका अधिकारी कारवाईसाठी पोहचले, त्यावेळी बंगल्याला कुलूप होतं. त्यामुळे केवळ प्रतिकात्मक कारवाई करण्यात आली.

'टाइम्स ऑफ इंडिया'तील वृत्तानुसार मुंबईच्या वर्सोवा भागातील एअर इंडिया सहकारी सोसायटीतील बंगला क्रमांक 10 (शांतिनिकेतन) बाहेर महापालिकेने कारवाईची नोटीस लावली होती. या नोटिशीनुसार अर्शद वारसीला दुसऱ्या मजल्यावरील एक हजार 300 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम 24 तासात पाडण्याचा इशारा देण्यात आला होता.

या नोटिशीला अर्शद वारसीने काहीच उत्तर न दिल्यामुळे बीएमसीने सोमवारी प्रतिकात्मक कारवाई केली.
वारसीने या वृत्ताला दुजोरा दिल्याचंही 'टाइम्स'ने म्हटलं आहे.

एअर इंडियातील निवृत्त कॅप्टनकडून अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी यांनी 2012 मध्ये बंगला खरेदी केला होता. नूतनीकरण करताना त्यांनी बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती आहे.

सोसायटीतील सदस्यांनी अर्शद वारसीविरोधात पालिकेकडे तक्रार केली होती. पालिकेच्या तपासणीत सोसायटीतील अनेकांनी अशाप्रकारे अनधिकृत बांधकाम केल्याचं निदर्शनास आलं. 2013 मध्ये पालिका कारवाई करण्याच्या तयारीत असताना अर्शदने त्यावर स्थगिती आणली. मात्र कोर्टाने नुकताच हा स्टे उठवल्याने पालिकेने कारवाई केली.