हृतिक रोशन-सुजान खान, अरबाज खान-मलायका अरोरा ही दशकभराच्या संसारानंतर विभक्त झालेली नजीकच्या काळातील काही जोडपी. मात्र नात्यात आलेल्या दुराव्यानंतरही त्यांनी मैत्र जपले आहेत. अर्जुन रामपाल-मेहर जेसिया यांच्या रुपाने अशा 'आदर्श विभक्त जोडप्यां'च्या यादीत भरच पडताना दिसत आहे.
अर्जुन आणि मेहर 1998 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. वीस वर्षांच्या संसारानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांना महिका आणि मायरा या दोन मुली आहेत. अर्जुन-मेहर कायदेशीदृष्ट्या विभक्त झालेले नसले, तरी लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे.
अर्जुन रामपाल आणि दक्षिण आफ्रिकन सुपरमॉडेल आणि अभिनेत्री गॅब्रिएला डिमेट्रिअॅड्स यांनी नुकतीच आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. बऱ्याच काळापासून ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. गॅब्रिएला 'सोनाली केबल' या चित्रपटात दिसली होती.
अशातच अर्जुनच्या प्रेयसीने गुड न्यूज दिली आहे. गॅब्रिएला गरोदर असल्याची गोष्ट मेहरने फारच स्पोर्टिंगली घेतलेली दिसते. विशेष म्हणजे गॅब्रिएलाचं बेबी शॉवर अर्थात डोहाळ जेवण लवकरच होणार असून त्याची तयारी मेहरने सुरु केली आहे.
मेहर जेसिया 1986 मध्ये 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेची मानकरी ठरली होती. नुकतंच तिने भावंडं आणि मित्रांच्या मदतीने इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात उडी घेतली आहे. तिच्या कंपनीला गॅब्रिएलाच्या 'बेबी शॉवर'चं काँट्रॅक्ट देण्यात आल्याचं 'बॉलिवूडशादीज.कॉम' या वेबसाईटवर म्हटलं आहे. गेल्या वर्षी अर्जुनसाठी गॅब्रिएलाने बर्थडे पार्टी आयोजित केली होती. तेव्हाही मेहरने तिला काही आयडियाज सुचवल्या होत्या.