अनुष्काने झापलेला अरहान शाहरुखसोबत झळकला होता
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2018 10:40 AM (IST)
अनुष्काने झापलेला अरहानचं बॉलिवूड कनेक्शन आता समोर आलं आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत अरहानने स्क्रीन शेअर केली आहे.
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या प्रवाशाला दम भरल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल झाल्यानंतर कचरा फेकणारा अरहान सिंह चर्चेत आला होता. मात्र अरहानचं बॉलिवूड कनेक्शन आता समोर आलं आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत अरहानने स्क्रीन शेअर केली आहे. अरहानने शाहरुख खानसोबत 'इंग्लिश बाबू देसी मॅम' (1996) या सिनेमात शाहरुखच्या मुलाची भूमिका साकारली होती. किंग खानसोबतचा एक फोटो अरहानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता आणि त्याला कॅप्शन दिलं होतं, 'किती सुंदर होते ते दिवस.' अरहानने शाहिद कपूरसोबत 'पाठशाला' (2010) या सिनेमात काम केलं आहे. अरहान बॉलिवूडमध्ये सनी सिंह नावाने प्रसिद्ध आहे. मात्र सध्या तो बॉलिवूडपासून लांब आहे. रुपेरी पडद्यापासून दूर असलेला अरहान एका मॅनेजमेंट कंपनीचा मालक असून तो फॅशन डिझायनरही आहे. काय आहे प्रकरण ? गाडीतून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका तरुणाला अनुष्काने चांगलंच खडसावलं होतं. दिल्लीतील रस्त्यावर घडलेल्या या सर्व प्रकाराचा व्हिडीओ विराट कोहलीने ट्विटरवर शेअर केला होता. "कोणी रस्त्यावर कचरा टाकत असेल तर त्याचाही असाच व्हिडीओ बनवा, ज्यामुळे स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण होईल," असंही विराट म्हणाला होता. विराटने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अरहानची फेसबुक पोस्ट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अरहाने फेसबुक पोस्ट लिहिली होती. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अरहानने लिहिलं की, 'अनुष्का शर्मा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांप्रमाणे माझ्यावर ओरडत होती, किंचाळत होती. मी माझ्या कृतीबद्दल क्षमस्व आहे. परंतु, श्रीमती अनुष्का शर्मा यांनी थोडी सभ्यता आणि नम्र भाषेत मला हे सर्व सांगितले असते तर त्यांना कमीपणा आला नसता. मी तर चुकून रस्त्यावर कचरा टाकला. मात्र, तुमच्या तोंडातून जो कचरा बाहेर पडला त्याचे काय? तसेच हे सर्व शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या विराट कोहलीच्या भंगार मनोवृत्तीचे काय?' अरहानच्या आईची संतप्त प्रतिक्रिया अरहान सिंहच्या आईने विराट आणि अनुष्कावर राग व्यक्त केला आहे. "माझ्या मुलाचा वापर या दोघांनी पब्लिसिटी मिळवण्यासाठीच केला आहे. सफाईच्या नावावर असा व्हिडीओ बनवून एखाद्याची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही नाही," असं या पोस्टमधून त्यांनी सुनावलं आहे.व्हिडीओ शेअर करताना किमान मुलाचा चेहरा तरी ब्लर करायला हवा होता, असंही त्या पुढे म्हणाल्या. तुम्हाला जर सफाईची एवढीच आवड असेल तर आधी तुम्ही राहत असलेल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी काहीतरी करा, असा सल्ला या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी विराट आणि अनुष्काला दिला आहे.