मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आता कचरा फेकणाऱ्या मुलाच्या आईचीही प्रतिक्रिया आली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित अरहान सिंह या रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलाच्या आईने विराट आणि अनुष्कावर राग व्यक्त केला आहे. "माझ्या मुलाचा वापर या दोघांनी पब्लिसिटी मिळवण्यासाठीच केला आहे. सफाईच्या नावावर असा व्हिडीओ बनवून एखाद्याची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही नाही," असं या पोस्टमधून त्यांनी सुनावलं आहे.

व्हिडीओ शेअर करताना किमान मुलाचा चेहरा तरी ब्लर करायला हवा होता, असंही त्या पुढे  म्हणाल्या. तुम्हाला जर सफाईची एवढीच आवड असेल तर आधी तुम्ही राहत असलेल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी काहीतरी करा, असा सल्ला या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी विराट आणि अनुष्काला दिला आहे.


दरम्यान आईची प्रतिक्रिया येण्यापूर्वी अरहान सिंगनेही एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. अनुष्का शर्मा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांप्रमाणे माझ्यावर ओरडत होती, किंचाळत होती. मी माझ्या कृतीबद्दल क्षमस्व आहे. परंतु, श्रीमती अनुष्का शर्मा यांनी थोडी सभ्यता आणि नम्र भाषेत मला हे सर्व सांगितले असते तर त्यांना कमीपणा आला नसता. मी तर चुकून रस्त्यावर कचरा टाकला. मात्र, तुमच्या तोंडातून जो कचरा बाहेर पडला त्याचे काय? तसेच हे सर्व शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या विराट कोहलीच्या भंगार मनोवृत्तीचे काय? अशी फेसबुक पोस्ट अरहानने लिहिली आहे.


काय आहे प्रकऱण ?

गाडीतून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका तरुणाला अनुष्काने चांगलंच खडसावलं होतं. दिल्लीतील रस्त्यावर  घडलेल्या या सर्व प्रकाराचा व्हिडीओ विराट कोहलीने ट्विटरवर शेअर केला होता. "कोणी रस्त्यावर कचरा टाकत असेल तर त्याचाही असाच व्हिडीओ बनवा, ज्यामुळे स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण होईल," असंही विराट म्हणाला होता.
विराटने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या : 

आलिशान कारमधून कचरा फेकणाऱ्या तरुणाला अनुष्काने भररस्त्यात झापलं