नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नुकतेच विवाह बंधनात अडकले. यानंतर टीम इंडियाच्या आगामी क्रिकेट दौऱ्याच्या निमित्ताने हे दोघेही दक्षिण आफ्रिकेला एकत्र गेले होते. पण शनिवारी रात्री अनुष्का दक्षिण आफ्रिकेतून एकटीच मायदेशी परतली. मुंबई विमानतळावर रात्री उशिरा तिचं आगमन झालं.

लग्न, रिसेप्शन आणि हनिमून अटोपल्यानंतर गेल्या 26 डिसेंबर 2017 रोजी विरानुष्का ही जोडी टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निमित्ताने एकत्रित गेली होती. वास्तविक, अनुष्काची ही तशी पहिली वेळ होती. जेव्हा ती कोणत्याही सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने नव्हे, तर टीम इंडियाच्या क्रिकेट मालिकेनिमित्त आपल्या पतीसोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली होती.

(फोटो सौजन्य : मानव मंगलानी)

पण काल रात्री उशिरा ती मायदेशी परतली. तिचं भारतात परतण्या पाठिमागे, ती लवकरच नव्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केप टाऊनमधील विराट आणि अनुष्काची केमिस्ट्री दोघांच्या चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाली. या दोघांचाही केप टाऊनमधील डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या व्हिडीओवर दोघांच्या चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडत होता.


शिवाय, या दौऱ्यादरम्यान दोनच दिवसांपूर्वी विराटचा खेळ पाहण्यासाठी आणि टीम इंडियाला चीअर-अप करण्यासाठी अनुष्का स्वत: क्रिकेट स्टेडियमवर उपस्थित होती. यावेळी अनुष्कासोबत भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागर, शिखर धवनची पत्नी आएशा आणि रोहित शर्माची पत्नी रितिका या देखील स्टेडिअमवर उपस्थित होत्या.



दरम्यान, विराट आणि अनुष्का गेल्या 11 डिसेंबर रोजी इटलीमधील टस्कनी शहरातील बोर्गो फिनोशिटो रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकले. यानंतर राजधानी दिल्ली आणि मुंबईत त्यांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.

राजधानी दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. तर मुंबईतील रिसेप्शनमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.