मुंबई : बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे दिग्दर्शक विजय रत्नाकर यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या सिनेमाच्या सेटवरील नवा फोटो समोर आला आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकारही दिसत आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत.

अनुपम खेर यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या व्यक्तिरेखांसोबत उभे दिसत आहेत. या फोटोत राहुल गांधींच्या भूमिकेत अर्जुन माथुर दिसत असून प्रियांका गांधींच्या भूमिकेत आहाना कुमरा आहे.


हा चित्रपट माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा बायोपिक आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेते असलेले डॉ. मनमोहन सिंह 2004 पासून 2009 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते.

संजय बारु यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. अनुपम खेर यात मनमोहन सिंह यांची भूमिका साकारत आहेत. अनुपम खेर यांच्या लूकमुळे चित्रपट चर्चेत आहे. याआधी अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या लूकमुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील त्यांची दाढी, डोक्यावर पगडी आणि देहबोली हुबेहूब मनमोहन सिंह यांच्यासारखीच आहे.