Annapoorani Controversy: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराचा 'अन्नपूर्णी' (Annapoorani) हा चित्रपट  गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून त्याला विरोध केला जात आहे. काही दिवसांपासून 'अन्नपूर्णी' या चित्रपटामुळे सोशल मीडियावर बॉयकॉट  नेटफ्लिक्स हा ट्रेंड झाला होता. 'अन्नपूर्णी' या चित्रपटामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आता नेटफ्लिक्सनं मोठा निर्णय घेतला आहे.


नेटफ्लिक्सनं थेट हटवला चित्रपट


नेटफ्लिक्सनं अन्नपूर्णी या चित्रपटाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहे. या चित्रपटात प्रभू राम यांच्याबद्दल आक्षेपार्ह डायलॉग आहे, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप अनेकांनी या चित्रपटावर केला. त्यानंतर आता नेटफ्लिक्सनं अन्नपूर्णी हा चित्रपट थेट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे.


नेमकं प्रकरण काय?


"राम मांसाहारी होता", असा संवाद अन्नपूर्णी या चित्रपटामध्ये घेण्यात आलाय.  त्यामुळे अनेकांनी या चित्रपटावर टीका केली.या चित्रपटाच्या विरोधात मुंबई आणि जबलपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जबलपूरमधील एका हिंदू संघटनेने चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट, निर्माता आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अन्नपूर्णी चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, ज्यात भगवान श्री राम यांच्या विरोधात अयोग्य टिप्पणी करून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप काही लोकांनी केला.  राम सोळंकी यांनी चित्रपटाच्या टीमच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 






नेटफ्लिक्सला बॉयकॉट करण्याची मागणी


अन्नपूर्णी  या चित्रपटामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप  करत अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर  ट्वीट शेअर करुन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,   "नेटफ्लिक्स इंडिया आम्ही तुम्हाला कडक इशारा देत आहोत. तुमचा हा चित्रपट ताबडतोब काढून टाका अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा." नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केल्यानंतर आता नेटफ्लिक्सनं हा चित्रपट त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन थेट डिलीट केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Annapoorani : "राम मांसाहारी होता" दाक्षिणात्य सिनेमातील संवादावरुन नवा वाद; नयनतारासह निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल