मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान पहिल्यांदाच शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात अभिनय करत आहे. बिग बींसोबत काम करताना दडपण आल्याचं आमीर सांगतो. इतकंच काय, बिग बींपासून लपून सिगरेट कशी प्यावी, यासाठी आमीरने चक्क अभिनेता शाहरुख खानचा सल्ला मागितला होता.


विजय कृष्ण आचार्य यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' चित्रपटात आमीर आणि अमिताभ एकत्र झळकणार आहेत. आमीर आपल्या 25 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच बिग बींसोबत काम करत आहे. खरं तर दोघंही सुपरस्टार. मात्र चित्रीकरणाच्या सुरुवातीच्या काळात आपण बुजलो होतो, अशी कबुली आमीरनेच दिली. बच्चन यांच्या मृदू स्वभावामुळेच अवघडलेपण दूर झाल्याचंही आमीर पुढे सांगतो.

अमिताभ बच्चन सेटवर असताना धूम्रपान कसं करावं, असा प्रश्न आमीरला पडला होता. बिग बींना आपलं व्यसन रुचणार नाही, अशी आमीरची समजूत होती. त्यामुळे आमीरने शक्कल लढवून थेट शाहरुखला गाठलं.

'मी आणि शाहरुख एकाच स्टुडिओत काम करत होतो. मी विचारलं- शाह, तू अमितजींच्या समोर स्मोक करतोस? म्हणजे मी स्मोकर आहे. त्यांच्यासमोर सिगरेट ओढली, तर त्यांना चालतं ना?' असं आमीरने विचारलं. शाहरुखने अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोहब्बते, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना यासारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.

'शाहरुख मला म्हणाला काहीच प्रॉब्लेम नाही. मी त्यांच्यासमोरच सिगरेट ओढायचो. यावर मी त्याला म्हटलं की, अरे तू त्यांची परवानगी घ्यायचास का? तो म्हणाला, नाही.. पण त्यांनी मला कधी थांबवलंही नाही. मी त्याला म्हटलं, मी नर्व्हस आहे. जर मी त्यांच्यासमोर सिगरेट ओढली आणि त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला तर? त्यानंतर काय करावं, हे मला कळत नाही' असं आमीरने सांगितलं.