मुंबई : बॉलिवूडच्या सिनेमांमुळे दर्जेदार मराठी सिनेमांची गळचेपी होणं ही काही नवीन गोष्ट नाही. अशाच प्रकारची गळचेपी गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाची झाली होती. अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'मुळे चित्रपटगृहांनी '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' बाजूला सारलं होतं.


'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ला सुरुवातीला मुंबईत हजारहून अधिक स्क्रीन्स मिळाल्या होत्या. तर '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाला 177 स्क्रिन्स मिळाल्या होत्या. मात्र सध्याची परिस्थिती उलट आहे. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'च्या स्क्रिन्सची संख्या दीडशेवर आली आहे. तर '... आणि डॉ काशिनाथ घाणेकर' सिनेमाच्या स्क्रीन वाढून 300 वर पोहोचल्या आहेत.


प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झालं आहे. त्यामुळे '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'चा अभिनेता सुबोध भावेनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. "तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने या आठवड्यात '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'चे संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात मिळून 6000 शोज. याचं संपूर्ण यश मराठी प्रेक्षक म्हणून तुमचं" असं ट्वीट सुबोध भावेनं केलं आहे.


नुकताच प्रदर्शित झालेल्या नाळ सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. 'नाळ' हा सिनेमाही 300 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. त्याची संख्या 400 वर गेली आहे. त्यामुळे दर्जेदार मराठी सिनेमांसमोर हिंदी सिनेमांचं वर्चस्व सध्यातरी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे टाकल्याचे चित्र सध्या दिसत आहे.