मुंबई : अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांच्या कुटुंबात नन्ह्या परीचं आगमन झालं आहे. नेहाने आज (18 नोव्हेंबर) सकाळी 11.30 वाजता मुंबईतील खारमध्ये एका खाजगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. बाळाच्या जन्मावेळी पती अंगद आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित होते. दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे.
अभिनेत्री नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असा गौप्यस्फोट खुद्द तिचा पती अंगद बेदीने काही दिवसांपूर्वी केला होता. नेहाने 'नो फिल्टर नेहा' या तिच्या रेडिओ चॅट शोमध्ये पती अंगदला निमंत्रित केलं होतं. या शोमध्ये अंगदने अनेक गुपितं उलगडली. आम्ही अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो, मात्र ती गर्भवती राहिल्याने घाईने लग्नाचा निर्णय घेतल्याची कबुली अंगदने दिली.
35 वर्षीय अंगद आणि 37 वर्षीय नेहा 10 मे रोजी पंजाबमधील एका गुरुद्वारात विवाहबंधनात अडकले होते. नेहा प्रेग्नंट असल्यामुळे दोघांनी घाईने लग्न केल्याच्या चर्चांना काही दिवसांतच सुरुवात झाली. मात्र नेहा आणि अंगद या दोघांनीही लग्नाआधी नेहा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा उडवून लावल्या होत्या.
लग्नानंतर नेहा कायम सैल कपड्यांमध्येच दिसत होती. गर्भवती असल्याचं समजू नये, यासाठी तिने काळजी घेतल्याचं म्हटलं जात होतं. अखेर लग्नाच्या तीन महिन्यानंतर म्हणजेच ऑगस्ट महिन्यात दोघांनी ही गुड न्यूज सोशल मीडियावरुन दिली. नेहा डिसेंबरमध्ये प्रसुत होईल, असा अंदाज होता. लग्नानंतर अवघ्या सव्वाचार महिन्यात तिची डिलीव्हरी झाली.
‘मिस इंडिया’ झाल्यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक सिनेमात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी विद्या बालनसोबत ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात, तर 'लस्ट स्टोरीज' या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती.
अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा पुत्र आहे. अंगद बेदीनेही काही चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन-तापसी पन्नू यांच्यासोबत तो पिंक सिनेमात दिसला होता.