Anant Ambani Radhika Merchant Wedding : ग्रँड प्री-वेडिंग फंक्शननंतर आता अंबानी कुटुंबात अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या (Anant Ambani Radhika Merchant Wedding) तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका काशी विश्वनाथाच्या चरणी ठेवली. आपल्या वाराणसीच्या दौऱ्यात नीता अंबानी (Nita Ambani) यांनी आपल्या लेकाच्या लग्नासाठी साड्यांची खरेदी केली आहे. नीता अंबानी यांनी जवळपास 60 साड्या खरेदी केल्या आहेत.
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, वाराणसी दौऱ्याच्या वेळी नीता अंबानी यांनी रात्री उशिरा तेथील एका हॉटेलमध्ये बनारसच्या विणकरांनी बनवलेल्या साड्यांचा स्टॉल लावला होता. त्याच ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या डिझाईन्सच्या साड्या पाहिल्या. साडी व्यापारी अमरेश कुशवाह यांच्याशी नीता अंबानी यांच्या टीमने संपर्क साधला होता. त्यानंतर अमरेश यांनी बनारसमधील एका हॉटेलमध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या अनेक साड्यांचा स्टॉल लावला आणि त्या नीता अंबानींना दाखवल्या. सर्व साड्यांपैकी नीता अंबानी यांना कोनिया ट्रेंडची लाख बूटी साडी आवडली. ती त्यांनी स्वतःसाठी खरेदी केली होती.
साडी व्यापारी अमरेश कुशवाह यांनी सांगितले की, नीता अंबानींच्या टीममधील लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी 60 साड्या घेऊन हॉटेलमध्ये गेलो. रात्री उशिरा, नीता अंबानी यांनी स्वतः ही साडी पाहिली. सोनं-चांदीची कारागिरी असलेली, लाल रंगाची लाख बुटी साडी आवडली. मी घेतलेल्या बाकीच्या साड्या आजही त्यांच्याकडे आहेत. नीता अंबानी यांना आवडलेली साडी बनवण्यासाठी 50 ते 60 दिवस लागले. नीता अंबानींनी स्वतःसाठी निवडलेल्या साडीची किंमत 1 लाख 80 हजार रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली.
साडी बनवणारे कारागीर छोटे लाल पाल यांनी सांगितले की, नीता अंबानींना आवडलेली साडी मी बनवली आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते सिल्कच्या कापडावर विणले गेले आहे. त्यावर चांदीची तार असून त्यावर सोन्याच्या पाण्याचा लेप आहे. ही साडी 60 ते 62 दिवसांत तयार करण्यात आली आहे. नीता अंबानींना माझी हाताने बनवलेली साडी आवडली, याचा आनंद झाला.
12 जुलैला अनंत-राधिकाचं लग्न
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लगीनघाई सुरू झाली आहे. अनंत अंबानी हे मागील दिवसांपासून आपल्या विवाहाचे आमंत्रण देत आहेत. अनंत आणि राधिका हे दोघेही 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विवाहबद्ध होणार आहेत. हा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार होणार आहे. विवाहनिमित्त सुरू असणारे कार्यक्रम 3 दिवस सुरू असणार आहेत. 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा होणार आहे. 14 जुलै रोजी मंगल उत्सव म्हणजेच स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. लग्नाच्या फंक्शनमध्ये बॉलिवूड स्टार्सही दिसणार आहेत. अनंत आणि राधिका वैयक्तिकरित्या सेलिब्रिटींना त्यांच्या लग्नाची पत्रिका देऊन आमंत्रित करत आहेत.