मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सन प्रेग्नंट आहे. एक जानेवारीच्या मुहूर्तावर बॉयफ्रेण्ड जॉर्ज पानायियोटो (George Panayiuotou) सोबत एमीचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर येत्या काही दिवसात एमी विवाहबंधनात अडकणार आहे.

एमीने 5 मे रोजी लंडनमध्ये निवासस्थानी साखरपुड्यानिमित्त पार्टीचं आयोजन केलं आहे. एमीने मुंबईहून जवळच्या मित्र-मैत्रिणींना बोलवलं आहे. झाम्बियामध्ये एक जानेवारी 2019 ला दोघांनी रिंग एक्स्चेंज केल्या होत्या. एमी आणि जॉर्ज ग्रीक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहे.

एमी सध्या 15 आठवड्यांची गर्भवती आहे. 'हे एक सरप्राईजच होतं. आम्ही बाळाचं नियोजन केलं नव्हतं. आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती' असं एमीने एका स्थानिक मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.


एमी आणि जॉर्ज 2015 पासून रिलेशनशीपमध्ये आहेत. एमीचा बॉयफ्रेण्ड जॉर्जचा परिवार हा ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानला जातो. लंडनमध्ये हिल्टन, पार्क प्लाझा आणि डबल ट्री यासारख्या आलिशान हॉटेलच्या चेन्स त्यांच्या मालकीच्या आहेत. जॉर्जचे वडील अँड्र्यू पानायियोटो हे प्रॉपर्टी डेव्हलपर असून त्यांची अंदाजे 3600 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

जॉर्ज हा अँड्र्यू यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. जॉर्जला एक सख्खा भाऊ आणी तीन सावत्र बहिणी आहेत. जॉर्ज 2014 मध्ये प्रसिद्ध मॉडेल डॅनिअल लॉएडला डेट करत होता. दोघा पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी जॉर्ज आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल आहे. यासाठी त्याला सहा महिन्यांची तुरुंगवारी झाली होती.

यापूर्वी, एमी जॅक्सन आणि अभिनेता प्रतीक बब्बर रिलेशनशीपमध्ये होते. मात्र अल्पावधीतच दोघांचं ब्रेकअप झालं. एमीने 'एक दिवाना था' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात प्रतीक तिचा सहकलाकार होता. त्यानंतर तिने सिंग इज ब्लिंग, फ्रिकी अली आणि अक्षय-रजनीकांतच्या 2.0 या हिंदी सिनेमात भूमिका केली.