Shankar Mahadevan: नेशनल अवॉर्ड विजेते गायक आणि संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) हे आपल्या जबरदस्त गाण्यांमुळे आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. ‘तारे जमीन पर’, ‘मितवा’, आणि 1998 मधील सुपरहिट इंडी पॉप अल्बम ‘ब्रेथलेस’ या गाण्यांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक जोशपूर्ण ट्रॅकपर्यंत शंकर महादेवन यांच्या आवाजावर पिढ्यानपिढ्या थिरकल्या आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का, एकदा “मी तुझं करिअर संपवीन!” अशी धमकी स्वतः अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी शंकर महादेवन यांना दिली होती. कारण होतं सुपरहिट गाणं ‘कजरा रे’! अर्थात बिग बींनी दिलेली ही धमकी मजेत होती.
‘बंटी और बबली’ मधील ‘कजरा रे’ हे गाणं आजही बॉलीवूडचं एव्हरग्रीन चार्टबस्टर मानलं जातं. शंकर एहसान लॉय यांचं संगीत, गुलजार यांचे बोल आणि वैभवी मर्चंट यांची कोरिओग्राफी यांनी या गाण्याला क्लासिक बनवलं. ऐश्वर्या राय, अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्या तगड्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे गाणं प्रचंड गाजलं.
कव्वाली आणि लोककजरीच्या फ्युजनसह तयार झालेलं ‘कजरा रे’ आजही लग्न, पार्टी आणि सोशल मीडियावर ट्रेंड होतं.
Shankar Mahadevan:काय म्हणाले शंकर महादेवन?
शंकर महादेवन म्हणाले, ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’च्या ऑल इंडिया महफिल पॉडकास्टमध्ये शंकर महादेवन यांनी ही आठवण शेअर केली. त्यांनी सांगितलं की, “अमिताभ बच्चन सर ‘रॉक अँड रोल’ गाण्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते आणि आम्ही सेटवर गेलो. माझं वजन थोडं जास्त असूनही, त्यांनी मला उचलून घेतलं कारण ते ‘कजरा रे’ गाण्याने खूप खुश होते. त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, ‘वाह! काय गाणं बनवलं आहे!’”
पण खरी मजा पुढे आली. शंकर पुढे म्हणाले, “जेव्हा मी अमिताभ सरांना सांगितलं की, ‘सर, आपल्याला आपल्या पार्टची डबिंग करायची आहे’, तेव्हा त्यांनी विचारलं, ‘कुठलं गाणं?’ मी म्हटलं, ‘कजरा रे!’ तेव्हाच त्यांनी हसत-हसत म्हटलं. ‘मी त्यावर काही डब करणार नाही. जर तू त्या गाण्याला हात लावला ना, तर मी तुझं करिअर संपवीन!” शंकर महादेवन म्हणाले, “मला ठाऊक होतं की ते फक्त मजेत बोलत होते, पण त्यांचं ते म्हणणं आजही विसरू शकत नाही.”