Don Movie Untold Story : चित्रपटसृष्टीत नाव कमावणे जितके कठीण आहे, तितकेच आपले नाव टिकवून ठेवणेही आव्हानात्मक आहे. अनेक कलाकार सिनेइंडस्ट्रीत आपले नशीब आजमावतात. त्यातील काहीजण प्रसिद्ध होतात, तर अनेकजण या गर्दीत हरवले जातात. हे केवळ अभिनेत्यांचेच नाही तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबतही घडते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 1978 चा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'डॉन' (Don Movie) मागील काही गोष्टही अशीच काहीशी आहे. निर्माते नरिमन इराणी (Nariman Irani) यांच्यासमोर तर अडचणींना डोंगरच उभा राहिला होता. विशेष म्हणजे डॉन या चित्रपटाच्या कथेला अनेकांनी नकार दिला होता.
आर्थिक अडचणीत होते नरिमन इराणी
नरिमन इराणी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते होते. पहिल्या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर त्यांना 12 लाख रुपयांचे मोठे नुकसान सहन करावे लागले. नरिमन इराणी यांच्यावर खूप मोठे कर्ज होते, ज्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी दुसरा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. काही वृत्तांनुसार, पटकथेच्या शोधासाठी इराणी हे सलीम-जावेद यांच्याकडे गेले होते. नरिमन इराणी यांनी आधीच त्यांना आर्थिक तंगीबद्दल सांगितले. इराणींचे बजेट मर्यादित होते. दोन-तीन महागड्या कथा ऐकवल्यानंतर सलीम-जावेद यांनी एक कथा इराणी यांना दिली. खरतंर चित्रपटाच्या हा कथेला अनेकांनी नकार दिला होता.
सलीम-जावेद यांनी दिली ऑफर
पटकथा लेखक जोडीने नरिमन इराणी यांना डॉन चित्रपटाची कथा ऑफर केली होती. हा चित्रपट चालला तर कथेचे पैसे घेऊ असे सलीम-जावेद यांनी इराणींना सांगितले होते. स्क्रिप्ट लॉक केल्यानंतर नरिमन इराणी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि कलाकारांचा शोध सुरू केला.
निर्माता होण्यापूर्वी इराणी यांनी अभिनेता मनोज कुमार यांच्या 'रोटी कपडा और मकान' या चित्रपटात सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्यांची भेट अमिताभ बच्चन, झीनत अमान आणि मनोज कुमारचे सहाय्यक दिग्दर्शक चंदर यांच्याशी ओळख झाली होती.
कलाकारांनी विनामोबदला केले काम
तिन्ही कलाकारांसोबत इराणी यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे स्क्रिप्ट लॉक केल्यानंतर त्यांनी अमिताभ आणि झीनत यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी संपर्क साधला. चंदर यांना चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून घेतले होते.
इराणी हे आर्थिक अडचणीतून जात आहेत हे या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांना माहित होते. कोणतेही मानधन न घेता चित्रपटात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अमिताभ, झीनत आणि चंदर यांनी 'डॉन' चित्रपटात मानधनाशिवाय काम करणार असल्याचे सांगितले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तरच मानधन घेऊ असा शब्द त्यांनी इराणी यांना दिला.
मनोज कुमार यांचा सल्ला ठरला मौल्यवान
नरिमन इराणी यांनी 'डॉन' चित्रपटाची कथा त्यांचे गुरू मनोज कुमार यांना सांगितली होती. मनोज कुमार यांनी चित्रपटाच्या उत्तरार्धात एक हलकंफुलकं गाणं ठेवण्यास सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल आणि हायव्होल्टेज अॅक्शनपटात त्यांना काहीसा ब्रेक मिळेल.
मनोज कुमार यांचा सल्ला ऐकून नरिमन इराणी संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे गेले. या जोडीने 'खाइके पान बनारस वाला' हे गाणे इराणी यांना दिले. या गाण्याने इतिहासच घडवला. हे गाणे चित्रपटातील आकर्षण ठरले.
चित्रपटाची जुळवाजुळव केली पण इराणी यांनी...
दुर्दैवाने 'डॉन' चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच नरिमन इराणी यांचे निधन झाले. कमालिस्तान स्टुडिओमध्ये झालेल्या अपघातात निर्मात्याला आपला जीव गमवावा लागला. इराणी यांच्या पत्नी सलमा आणि इतरांनी हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 'डॉन' हा चित्रपट फारशी प्रसिद्धी न करता प्रदर्शित झाल्याचे बोलले जात आहे. पण प्रेक्षकांना हा पिक्चर आवडला आणि तो 1978 सालचा तिसरा सर्वात मोठा हिट ठरला.