मुंबई : महानायक अमिताभ बच्चनने 2015 मध्ये मुलगा अभिषेक बरोबर आपल्या खासगी गुंतवणुकीतून सिंगापूरच्या मेरिडिअन टेक पीटीई कंपनीत 1 कोटी 60 लाख रूपये गुंतवले.


व्यंकट श्रीनिवास मीनावल्ली यांच्या मालकीच्या या कंपनीबद्दल फारशी माहितीही नव्हती. पण मेरिडिअनची उप कंपनी असलेली जिद्दू डॉट कॉम ही कंपनी लाँगफिन कॉर्पने विकत घेतली. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, या व्यवहारानंतर मेरिडिअन टेकमध्ये अमिताभ आणि अभिषेकला लाँगफिन कॉर्पचे तब्बल 25 लाख शेअर्स मिळाले.

सोमवारी नेसडॅक या अमेरीकन शेअरबाजारात लाँगफिनच्या एका शेअरची किंमत 70 डॉलर होती. म्हणजेच 2015 साली 1 कोटी 60 लाख रुपये गुंतवले आणि 2017 मध्ये अमिताभ यांना परतावा मिळाला.. तब्बल 114 कोटी... म्हणजेच गुंतवणुकीचा परतावा मिळाला... जवळपास 75 पट.

अमिताभ यांनी गुंतवणूक केलेली कंपनी ही क्लाउड स्टोरेज आणि ई डिस्ट्रीब्यूशनमधली स्टार्टअप साईट होती. पण डिसेंबर 2017 मध्ये ही कंपनी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी एम्पावर्ड सोल्यूशन प्रोव्हायडर झाली होती. जी जगभरातल्या क्रीप्टोकरन्सीचा उपयोग करून मायक्रोफायनान्स करत होती.

ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी यांसारख्या जादूमय शब्दांनी अशी काही कमाल केली, की गेल्या बुधवारपासून सोमवारपर्यंत कंपनीचा शेअर तब्बल हजार पटीने वाढला. याच आठवड्यात जिद्दू कंपनीच्या खरेदीचा व्यवहार झाल्यावर तर ही वाढ किंमत अडीच हजारपटीने वाढली आणि बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरंसीच्या नावसाधर्म्याने अमिताभ आणि अभिषेक हे बच्चन पितापुत्र दोन वर्षात अक्षरशः मालामाल झाले.