Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एव्हर ग्रीन अभिनेत्यांपैकी एक आहेत. बिग बी हे त्यांच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ हे कोट्यवधींचे मालक आहेत. लग्झरी गाड्या, कोट्यवधींचे घर अशी अमिताभ बच्चन यांची संपत्ती आहे. पण सध्या कोट्यवधींचे मालक असणारे अमिताभ बच्चन हे एकेकाळी आर्थिक अडचणींचा सामना करत होते, हे अनेकांना माहिती नसेल. बिग बी हे अडचणीत असताना धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी त्यांना आर्थिक मदत करण्याची ऑफर दिली होती. अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं.
अमिताभ बच्चन करत होते आर्थिक अडचणींचा सामना
अमिताभ बच्चन यांनी 1990 च्या सुमारास 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड' या व्यवसायाची सुरुवात केली परंतु अखेरीस हा व्यवसाय ठप्प झाला आणि त्यांच्यावर खूप कर्ज झाले. त्यावेळी बच्चन यांना दिवंगत धीरूभाई अंबानी यांनी आर्थिक मदतीची ऑफर दिली होती परंतु ही ऑफर बिग बींने नाकारली. 2017 च्या एक व्हिडीओ ब्रुट इंडियानं त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं, "माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा मी आर्थिक अडचणीत होतो. दिवालिया हो गया”
“माझ्यावर करोडोंचे कर्ज होते. उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद करून माझ्या घरावर सरकारने छापा टाकला. माझ्या वैयक्तिक बँक अकाऊंटमध्ये एकही रुपया नव्हता. धीरूभाईंना याबाबत कळाले. कुणालाही न सांगता त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा आणि माझा जिवलग मित्र अनिल यांना सांगितले की, 'तो वाईट काळातून जात आहे, त्याला थोडे पैसे द्या' .त्यांना जी रक्कम द्यायची होती त्याने माझे सर्व प्रश्न सुटले असते. पण मला वाटले की मी त्यांची पैसे स्वीकारू शकणार नाही, ” असंही अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.आता बिग बी हे प्रभासच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आागमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: