Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'हे दुकानात मिळणार नाही..' हे वाक्य त्यांना महागात पडलं आहे. खोटी माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बिग बींच्या एका वाक्यामुळे ऑफलाईन दुकानदार नाराज झाले आहेत.
एका जाहिरातीमुळे अमिताभ बच्चन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बिग बी हे फ्लिपकार्टचे ब्रँड अँम्बेसिडर आहेत. आता फ्लिपकार्टची 'द बिग बिलियन डेज' ही ऑफर सुरू होणार आहे. बिग बी यांनी या ऑफरसंबंधित एक जाहिरात केली असून या जाहिरातामुळेच त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
फ्लिपकार्टची 'बिग बिलियन' (The Big Billion Days) ऑफर लवकरच सुरू होणार आहे. या ऑफरची माहितीदेणारी एक जाहिरात बिग बी यांनी केली होती. यातील मोबाईल कंपनीच्या जाहीरातीमुळे ते चर्चेत आले आहेत. या जाहीरातीत ते म्हणाले की,"या वस्तू तुम्हाला ऑफलाईन दुकांनामध्ये मिळणार नाहीत". त्यांच्या या एका वाक्यामुळे ऑफलाईन दुकानदार नाराज झाले असून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिग बी यांनी खोटी माहिती दिली असून ग्राहकांमध्ये भ्रम निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खोटी माहिती दिल्याने बिग बी यांच्याविरोधात तक्रार दाखल
सीएआयटी (कॉन्फीडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) ने बिग बीं च्या विरोधात सीसीपीए (सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथरिटी) ने खोटी माहिती दिल्या प्रकरणी तक्रार दिली आहे. सीएआयटीने दिलेल्या माहितीनुसार,"बिग बी यांनी केलेली जाहिरात ऑफलाईन दुकानदारांच्या विरोधात जाणारी आहे. त्यामुळे ही जाहिरात मागे घ्यावी. बिग बी यांनी ऑफलाईन दुकानदारांचा अपमान केला असून त्यांच्याविरोधात दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा".
सीएआयटीचे महासचिव प्रविन खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 2(47) नुसार, फ्लिपकार्टने अमिताभ बच्चन यांच्यामार्फत जनतेची फसवणूक केली आहे. फ्लिमकार्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही दुकानात ग्राहकांना कमी किंमतीत मोबाईल फोन मिळणार नाही, असे या जाहिरातीत म्हटले आहे. त्यामुळे ऑफलाईन दुकानदारांना या गोष्टीची फटका बसेल. आता ऑफलाईन दुकानांमध्येही अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट्स ठेवण्यात येत आहेत. फ्लिपकार्टने आता युट्यूबवरील ही जाहिरात प्रायव्हेट केली आहे.
संबंधित बातम्या