नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या बहारदार अभिनयाच्या जोरावर बच्चन यांना आतापर्यंत अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्काराची घोषणा होताच बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.


'सात हिंदुस्थानी' या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. गेल्या 50 वर्षांमध्ये बच्चन यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार, बहुमान आपल्या नावे केले आहेत. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने केला जाणार आहे. केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.

बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. आपल्या कारकिर्दीत बिग बींनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतात. सध्या त्यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा रिअॅलिटी शो टीव्हीवर सुरु आहे, त्यालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या जंजीर, शोले, डॉन, त्रिशुल, अग्निपथ, ब्लॅक, सरकार, निःशब्द, चीनी कम, पा आणि पिकू यांसारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अभिनेते अमिताभ बच्चन मागील अनेक वर्षांपासून आपलं मनोरंजन करत आहेत. जवळजवळ दोन पिढ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. त्यांची यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देश तसेच देशाबाहेर असणारे अमिताभ यांचे चाहतेदेखील खूश होतील. त्यांना या पुरस्काराबद्दल खूप शुभेच्छा.