मुंबई : सैफ अली खानची मुलगी सारा 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. साराच्या डेब्यू सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तगड्या स्पर्धेचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबतच साराच्या सिनेमाची टक्कर होण्याची वेळ आली होती.
केदारनाथ चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 21 डिसेंबर 2018 ला प्रदर्शित होणार होता. याच दिवशी आनंद एल राय यांचं दिग्दर्शन असलेला शाहरुख खानचा आगामी चित्रपटही रीलिज होण्याची चिन्हं आहेत. मात्र केदारनाथ चित्रपटाच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी आपल्या सिनेमाची तारीख पुढे-मागे हलवण्याची तयारी दर्शवली आहे.
'सध्या मला काहीच माहित नाही. हवामानाच्या स्थितीमुळे केदारनाथचं चित्रीकरण रखडलं. आम्ही यावर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करणार होतो. पण आता कोणताच पर्याय नाही' असं प्रेरणा यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
अरोरा यांच्या निर्मिती संस्थेचे परमाणू (जॉन अब्राहम), फॅनी खान (ऐश्वर्या राय), परी (अनुष्का शर्मा) असे काही सिनेमे रीलिजच्या मार्गावर आहेत. त्यानुसार केदारनाथ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करावी लागणार आहे.
'केदारनाथ' चित्रपटात सारासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत झळकणार असून अभिषेक कपूरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.